
कर्जत ः बातमीदार – कर्जत शहरातील संजयनगर भागात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. ती व्यक्ती 21 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीला घेऊन कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आली होती, तर पाच दिवसांपूर्वी माथेरानमध्ये आलेल्या एका महिलेला कोरोना झाला असून त्यांची कोरोना टेस्ट 22 मे रोजी करण्यात आली होती. दरम्यान, कर्जत तालुक्यातील हा नववा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून माथेरानमध्येही तब्बल 65 दिवसांनी कोरोनाने शिरकाव केला आहे. कर्जत शहरातील संजयनगर भागातील पूजन पॅलेस या इमारतीमधील मुंबई-गोवंडी येथून आलेल्या 43 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे 21 मे रोजी समजले. त्याआधी ती कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासह आली होती. 22 मे रोजी पूजन पॅलेसमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार जणांच्या कोरोना टेस्ट करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल रविवारी सकाळी जे. जे. रुग्णालयाकडून प्राप्त झाले. त्यानंतर संजयनगर कंटेन्मेंट झोनमधील पूजन पॅलेसमधील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 38 वर्षीय व्यक्तीला आरोग्य विभागाच्या पथकाने तत्काळ पनवेल येथे नेले. तेथील इमारतीतील सर्वांना होम क्वारंन्टाइन केल्याने नव्याने आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील चार जणांच्या कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.