जळगाव : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी
(दि. 13) जळगावमधील प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला. थकलेले साथीदार एकमेकांचा आधार बनू शकतात, पण महाराष्ट्राची स्वप्ने आणि येथील तरुणांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे माध्यम होऊ शकत नाहीत, असे सांगत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा रविवारी जळगावमध्ये झाली. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. या वेळी त्यांनी प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी दोन्ही पक्षांचा खरपूस समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी विरोधकांना खुले आव्हान दिले. हिंमत असेल तर विरोधकांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केंद्र सरकारने हटवलेले कलम 370 पुन्हा लागू करून दाखवण्याचे आश्वासन द्यावे. 5 ऑगस्टला घेतलेला निर्णय आम्ही बदलू, असे सांगा, नाहीतर नक्राश्रू ढाळणे थांबवा, असे ते म्हणाले, तसेच तुमच्यात हिंमत असेल तर तिहेरी तलाक पुन्हा लागू करून दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका सभेतील व्हायरल व्हिडीओचा उल्लेख करीत पंतप्रधान मोदींनी या वेळी त्यांची खिल्ली उडवली. आमच्या व्यासपीठावर युवा नेते आहेत. आम्ही आताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला. एक नेता सोफ्यावर बसला होता. त्यांच्या पक्षाचे नेते बाजूला आहेत. तीन-चार जणांनी त्यांना हात देऊन उभे केले. त्यांना माळ घातली. एका युवा नेत्याने त्यात मान घातली. इतके मोठे नेते की ते आयुष्यभर टीव्ही, वर्तमानपत्रांत झळकले. या इतक्या मोठ्या नेत्याचे मन इतके लहान आहे की त्यांनी त्या युवा नेत्याच्या डोक्यावर कोपरा मारून त्याला बाजूला केले. आपल्या युवा नेत्यांना जे सोबत घेऊन जात नाहीत, ते महाराष्ट्राला काय पुढे घेऊन जातील, अशी टीका त्यांनी केली.
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस सरकारच्या कामाचे आवर्जून कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. आता जनतेने पुन्हा सत्ता दिल्यास सरकार उर्वरित कामेही पूर्ण करेल, असे मोदी म्हणाले.
शरद पवारांची विवेकबुद्धी संपली : मुख्यमंत्री पराभव समोर दिसत असल्याने शरद पवार यांची विवेकबुद्धी संपली आहे. त्यांनी हातवारे केले, मात्र आम्ही नटरंगसारखे हातवारे करीत नाहीत. 24 तारखेला कळेल कोण खरा पैलवान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या बार्शीतील हातवार्यांसह केलेल्या वक्तव्याला जळगावमध्ये प्रत्युत्तर दिले.