‘लिंबू कापला रस गळू लागला’
पनवेल : प्रतिनिधी : पनवेलच्या सुपुत्र असलेल्या मयूर नाईकने आपल्या आवाजाच्या जादूने कमाल केली असून त्याने गायलेल्या ‘लिंबू कापला रस गळू लागला’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. विशेष म्हणजे या लग्न सिझनमध्ये 72 लाखाहून अधिक रसिकांनी युट्युबवर या गाण्याला दाद देऊन हे गाणे सुपर डुपर हिट केले आहे. हे गाणे हळदी लग्न गीतांमधील सर्व गाण्यांना मागे टाकून कमी वेळेत सुपर डुपर रेकॉर्ड ब्रेक गाणं ठरले आहे. आज लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या ओठावर फक्त आणि एकच गाणं आहे ते म्हाणजे लिंबू कापला रस गळू लागला. आज कुठे ही हळद असो, लग्न असो, कुठे जत्रा असो, क्रिकेटचे सामने असो, सगळीकडे हेच गाणं वाजत आहे, तसेच सोशल मीडियावर टिकटॉक, लाईक, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, तसेच अनेक अॅपवर देखील या गाण्याने चांगलीच गगनभरारी घेतली आहे. या गाण्याच्या संगीत आणि लिरिक्सने लोकांच्या हृदयात घर केले आहे. या गाण्याच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळी गाणीसुद्धा तयार झाली आहेत. आजच्या आधुनिक युगात आगामी पिढीला पारंपरिक, तसेच आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणे, तसेच ती टिकवून ठेवणे हा या गाण्याचा मूळ उद्देश आहे. पनवेल तालुक्यातील नांदगाव गावातील मयूर नाईक या तरुण गायकाने या गाण्याच्या माध्यमातून आपल्या कलेची चुणूक दाखवून दिली असून लवकरच त्याची आणखी गाणी रसिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. आज समाजातील विविध संघटना, विविध मंडळ, क्रीडा, कला क्षेत्रातून, तसेच महाराष्ट्रातून अनेक गावांमधून मयूर नाईकचे कौतुक होत आहे.