Breaking News

चिरनेर, उरणच्या बाजारात रानभाज्या दाखल; ग्राहकांची वाढती मागणी

चिरनेर ः वार्ताहर

पावसाला सुरुवात झाली की रानातील बिनखताच्या जीवनसत्त्वाने भरलेल्या हिरव्या भाज्या खायला मिळतात. उरण, चिरनेर परिसरातील आदिवासी कातकरी डोंगरावर जाऊन या भाज्या गोळा करून बाजारात विकायला आणतात. त्यामुळे आदिवासी लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ह्या रानभाज्यांकडे पाहिले जाते. दरवर्षी या रानभाज्यांची लोक वाट पाहत असतात. रानभाज्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी बाजारपेठेत दिसत आहे. उरण तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगर आणि जंगलांनी वेढलेला असल्याने अनेक दुर्मीळ आणि औषधी वनस्पती, फळे व रानभाज्या आढळून येतात. पावसाची चाहूल लागली की या भागातील आदिवासी जंगल, डोंगर व माळरानात आढळणारे करवंदे, हळदे यांसारखे कंद तसेच शेवळी, टाकळा, करटोली, कोरला, भारंगी, फोडशी, कुर्ळू भोकर यांसारख्या रानभाज्या गोळा करून त्याची चिरनेर व उरण बाजारपेठेत विक्री करून आपली उपजीविका भागवतात. आरोग्यवर्धक असल्याने खवय्यांनाही रानभाज्यांचे वेध लागते. पावसाळ्याच्या सुरुवातीला नेहमीच्या भाज्यांचे भाव प्रचंड वाढत असताना त्या मानाने रानभाज्या स्वस्त मिळत असल्याने त्यांना ग्राहकांची मोठी मागणी आहे. रानभाज्या कीटकनाशके व खतांच्या वापराशिवाय मिळत असल्याने पौष्टिक व औषधी असतात. त्यामुळे शासनाने या भागातील जंगल आणि डोंगरातील माती काढण्यावर निर्बंध आणावेत, अशी मागणी आदिवासी करीत आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply