दिनांक 12 जुलै रोजी परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) प्रवर्तित स्वाध्याय परिवार ’वृक्ष मंदिर दिन’, ’माधव-वृंद दिन’ व ’युवा दिन’ ही उत्सव त्रिवेणी साजरी करतो. दादांची सुपुत्री व स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख श्रीमती धनश्री तळवलकर (दीदी) यांचाही 12 जुलै हा जन्मदिवस. हल्ली पर्यावरण, वृक्षसंवर्धन, निसर्गामुळे मिळणारा ऑक्सिजन या सर्व विषयांवर समाजात अनेक लोक खूपच तळमळीने बोलताना दिसतात, पण प्रश्न असा आहे की पर्यावरण किंवा वृक्षसंवर्धन यांकडे आपण कुठल्या दृष्टीने पाहतो. आपण सामान्यतः निसर्गाकडे, सृष्टीकडे केवळ उपभोग अथवा उपयोग या स्वार्थी दृष्टीने पाहतो. निसर्गाचे संवर्धन करून मला काय फायदा असाच विचार बहुतांश वेळा केला जातो, पण जो निसर्ग, जे वृक्ष आपल्याला परोपकार शिकवतात त्यांच्याकडे फक्त स्वार्थी दृष्टीनेच पाहावे का हा प्रश्न आहे. ’वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ असं आपले तुकाराम महाराज सांगून गेले पण तरीही 21 व्या शतकातील स्वार्थी मानवाने वृक्षांना ’सोयरे’ न मानता आपल्याला सावली, ऑक्सिजन, पाणी, फुलं, फळं हे सर्व देणारे फक्त एक माध्यम मानले. स्वाध्याय परिवार पण वृक्ष लावतो, संवर्धन करतो, परंतु उपभोग, उपयोग किंवा फायदा इतकाच संकुचित दृष्टिकोन न ठेवता, निसर्गाकडे, वृक्षवल्लींकडे ’उपासना’ या भद्र दृष्टीने पाहिले पाहिजे हे सांगून वृक्षात वासुदेव व हिरवाईत हरी पाहण्याची जी मंगल दृष्टी पांडुरंगशास्त्रींनी दिली, त्या दृष्टीने स्वाध्याय परिवार काम करतो. याच उपासनेच्या मंगल भावनेतून वृक्ष लावून त्यांचे पुजारी या पवित्र भावनेने स्वाध्याय परिवाराच्या ’वृक्षमंदिर’ या अनोख्या प्रयोगात संवर्धन केले जाते. दादा नेहमी म्हणत असत की माझी आई घरात पोळ्या करते पण केवळ पोळी भाजी करण्याकरता आई नाहीये, आईला काहीतरी प्लस व्हॅल्यू आहे, अतिरिक्त मूल्य आहे. तसेच निसर्ग, वृक्ष मला प्राणवायु देईलच पण त्याला त्याच्यातील हरीच्या निवासामुळे काहीतरी अतिरिक्त मूल्य आहे. आजमितीला याच पवित्र भावनेतून शेकडो एकर जमिनीवर विस्तारलेली 27 वृक्षमंदिरे भारतात उभी आहेत. आसपासच्या वीस गावातील स्वाध्यायी आपली पूजा समजून या वृक्षमंदिरांत निश्चित केलेल्या दिवशी येतात व उपासना म्हणून वृक्षांचे संवर्धन करतात. त्यांच्यावर पुत्रवत् प्रेम करतात व निसर्गाशी भावनिक तादात्म्य साधतात. अशाच पवित्र भावनेतून लाखों स्वाध्यायी 12 जुलै या दिवशी एका बालतरूचे आपल्या घरी रोपण करतात व रोज त्याच्यावर नारायण उपनिषदाच्या मंत्रपठणासह जलाभिषेक करतात आणि हा शिरस्ता गेली 29 वर्षे म्हणजे 1992 पासून निरंतर चालू आहे. या प्रयोगाला दादांनी नाव दिले ’माधव-वृंद’. गेल्या पाच वर्षांत 21 लाख झाडं या प्रयोगाच्या माध्यमातून घरोघरीं लावली गेली. तसेच सार्वजनिक ठिकाणी तिथल्या प्रशासनाच्या परवानगीने गेल्या पाच वर्षांत वड आणि पिंपळ मिळून जवळपास 40,000 वृक्षांचे रोपण करण्यात आले. धनश्रीदीदींचाही 12 जुलै हा जन्मदिवस. दादांच्या देशविदेशातील जवळपास 25 हजार युवा केंद्रांतील युवक-युवती ज्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली सतत रचनात्मक काम करत आहेत, त्या दीदींचा जन्मदिवस ’युवा दिन’ म्हणूनही सार्थ साजरा करतात. अशा प्रकारे ’वृक्ष मंदिर दिन’, ’माधव-वृंद दिन’ व ’युवा दिन’ ही उत्सव त्रिवेणी साजरी दीदींच्या जन्मदिनी साजरी होते. निसर्गाकडे बघण्याचा एक दैवी व निःस्वार्थ दृष्टिकोन असू शकतो हे विश्वाला सांगणारे महान तत्त्वचिंतक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्रीजी तसेच लाखो युवकांना एक विशिष्ट दिशा देऊन युवाशक्तीला विधायकतेकडे वळवणार्या दीदींना आजच्या दिवशी वंदन!
-आमोद दातार