महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील धुसफूस राज्याला नवी नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटून गेले, तरी त्यांच्यातील कुरबुरी काही संपण्याचे नाव घेत नाहीत, किंबहुना हेवेदावे वाढतच चालले आहेत. विशेषत: आपल्याला डावलले जात असल्याची भावना काँग्रेसमध्ये वारंवार उफाळून येत असल्याचे दिसून येते. परस्परविरोधी विचारधारा आणि ध्येय-धोरणे असलेले तीन पक्ष महाविकास आघाडी अशा गोंडस नावाखाली राज्यात एकत्र आले आणि त्यांनी हो-नाही, हो-नाही म्हणता किमान समान कार्यक्रम हा आणखी एक शब्द पुढे करीत सरकार स्थापन केले. राजकारणात असे प्रयोग होत असतात. यापूर्वीही ते झालेले आहेत, पण सरकार स्थापन केल्यानंतर ते सुरळीतपणे चालविण्यात खरी कसोटी लागते. नेमकी इथेच महाविकास आघाडी माती खाताना दिसून येते. आघाडीतील पक्षांनी मनापासून एकत्र येत जनहिताच्या दृष्टीने सरकार चालविणे अपेक्षित असताना इथे जनतेला न्याय मिळवून देणे सोडाच, खुद्द आघाडीतच अन्याय होत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. आपली नाराजी याआधीही वेळोवेळी काँग्रेसने बोलून दाखविली आहे. इतकेच नव्हे तर याकडे हायकमांडचेही लक्ष वेधले होते, पण त्याचाही फारसा उपयोग होताना दिसत नाही. कारण हा विषय राज्य पातळीवरचा आहे. म्हणूनच नाराजीनाट्य हायकमांडपुढे गेल्यावर हे पेल्यातील वादळ तेवढ्यापुरते क्षमते. मग पुढे काही काळानंतर पुन्हा राज्यातील काँग्रेस नेत्यांचा राग उफाळून येत असल्याचे पाहावयास मिळते, मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ते निशाणा साधण्यास कचरत नाहीत. लोणावळ्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला. तो देतानाच त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पटोले म्हणाले की, मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितले आहे. ते बोलले तर ठीक आहे. मग मी बोललो तर त्रास का होतो. या वेळी पटोलेंनी अजित पवार यांना उद्देशून आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते आपल्या लोकांची कामे करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचे ऐकायचे की नाही ते त्यांनी ठरवायचे; कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही, असा टोला लगावला. इथपर्यंत ठीक होते, पण पटोलेंनी पुढे बोलताना ‘ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचेच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे,’ असे सांगत कार्यकर्त्यांना स्वबळाच्या तयारीसाठी लागण्याची सूचना केली. एरवी चिमटे, टोल्यांवरची भाषा आता सुरा, रागपर्यंत गेली आहे. यावरून काँग्रेस ही शिवसेना, राष्ट्रवादीवर किती नाराज आहे हे स्पष्ट होते. भविष्यात आणखी काही ऐकायला मिळाले तर नवल वाटायला नको. वास्तविक या तिन्ही पक्षांनी राज्यापुढे कोरोना, मराठा, ओबीसी आरक्षण व अन्य प्रश्न आहेत त्यावर मार्ग काढण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असताना यांची मात्र आपापसात नाराजी, भांडणे सुरू आहेत. त्यांनी हे सारे थांबवावे आणि जनतेसाठी कामाला लागावे, एवढेच त्यांना सांगणे आहे.
Check Also
नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …
RamPrahar – The Panvel Daily Paper