मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड शहरातील भाजीविक्रेते, विविध दुकानदार, किराणा दुकानदार, औषध विक्रेते, हमाल अशा सर्व घटकांनी स्वतःची व आपल्या नोकरांची आरटी-पीसीआर टेस्ट करून घ्यावी. त्यायोगे शासनाच्या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळावा यासाठी मुरूड नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद कौटुंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, लेखनीक मनोज पुलेकर, नितेश माळी यांनी रविवारी (दि. 11) सर्व बाजारपेठ फिरून दुकानदार व विक्रेत्यांची स्वतः भेट घेऊन मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे. रविवारपासून मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात आरटी-पीसीआर टेस्ट करण्याचा प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी टेस्ट करून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मुरूड ग्रामीण रुग्णालयाने टेस्टसाठी उत्तम नियोजन केले असून आधार कार्डची नोंदणी झाल्यावर त्वरित टेस्ट करण्यात येत होती. या वेळी मुख्याधिकारी गोविंद कौटुंबे यांनी बाजारपेठेतील विविध दुकानदारांशी संपर्क करून सर्व भाजीविक्रेते व किराणा माल व अन्य घटकांनी स्वतःसह दुकानात काम करणार्या घटकांनी 15 जुलैपर्यंत टेस्ट करून घ्यावी. प्राप्त प्रमाणपत्र स्वतःजवळ ठेवावे. 16 जुलैनंतर सर्व दुकानांची तपासणी करण्यात येणार असून जर टेस्ट केली नसेल, तर अशा दुकानदारांवर दंडात्मक व दुकान बंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तेव्हा सर्व व्यापारी बंधूंनी आम्हाला सहकार्य करून लवकरात लवकर आपला टेस्ट रिपोर्ट स्वतःजवळ ठेवण्याचे आवाहन केले. या वेळी काही दुकानदारांनी खासगीमध्ये टेस्ट केली तर चालेल का, असा प्रश्न मुख्याधिकार्यांना केला. तेव्हा त्यांनी सांगितले की, खासगीत टेस्ट केली तरी चालेल, परंतु त्याचे प्रमाणपत्र आपल्याजवळ ठेवावे. बाजरपेठेत नगर परिषदेकडून जनजागृती करण्यात येऊन टेस्ट करणार्या लोकांना बसण्याची व्यवस्था व्हावी यासाठी खुर्च्याही उपलब्ध करून देण्यात आल्या. दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष जाहिद फकजी यांनी आपल्या सर्व सहकारी दुकानदारांना घेऊन ग्रामीण रुग्णालयात पोहचून सर्वप्रथम टेस्ट करून घेऊन प्रशासनाच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद दिला आहे. लवकरच सर्व व्यापारी व दुकानदार टेस्ट करून घेण्यासाठी मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात गर्दी करणार असून प्रशासनाच्या मोहिमेस उत्तम प्रतिसाद देत आहेत.