नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई, पनवेलमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लग्नसमारंभ लांबणीवर जाऊ लागली आहेत. यात व्यावसायिक छायाचित्रकारांचे हाल होत आहेत. वर्षभर कॅमेरा पडूनच असल्याने अनेकांनी स्टुडिओ बंद करून जोडधंद्याचा आधार घेतला आहे. गतवर्षी कोरोनाने केलेला कहर दोन महिन्यांपूर्वी बहुतांशी कमी झाला होता. मात्र मागील महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. मुंबईसह राज्याच्या इतरही भागांत हीच परिस्थिती असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा फटका इतर व्यवसायांप्रमाणेच व्यावसायिक छायाचित्रकारांनादेखील बसत आहे. लग्नाच्या ठरलेल्या तारखा रद्द होत असल्याने छायाचित्रकारांना हाती आलेले काम गमवावे लागत आहे. त्यामुळे केवळ याच कामावर अवलंबून असणार्यांना स्टुडिओच्या भाड्यासह कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या, असा प्रश्न पडला आहे, मात्र राजकीय सभा, बाजार अशा इतरही ठिकाणी गर्दी जमत असताना, केवळ विवाहसोहळे व त्यावर अवलंबून असणार्या व्यवसायांवरच बंधने का, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. लॉकडाऊनच्या भीतीने गतवर्षी प्रमाणे यंदाही लग्नाच्या ठरलेल्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. शहरातील हॉल व्यावसायिकांकडूनदेखील वधू-वर कुटुंबीयांना सुरक्षेच्या दृष्टीने तशी विनंती केली जात आहे. त्यापैकी काही कुटुंब मागील एक वर्षापासून लग्नाची ठरलेली तारीख रद्द करून कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आल्यास धूमधडाक्यात लग्नसोहळा उरकण्याचा प्रतीक्षेत आहेत. अधिक काळ त्यांच्या हाताला काम न मिळाल्यास हे क्षेत्रच संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
जोडधंद्याचा पर्याय
नवी मुंबई, पनवेलमध्ये शेकडो व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. अनेक स्टुडिओ कायमचे बंद करण्यात आले आहेत. वर्षभरापासून होणारे कार्यक्रम रद्द असल्याने मिळणारे काम बंद झाले आहे, तर स्टुडिओत येऊन फोटो काढणार्यांनीही पाठ फिरवली आहे. त्यामुळे काहींनी त्याच ठिकाणी जोडधंदा सुरू केला आहे.
मागील एक वर्षापासून स्टुडिओ बंद आहे. इतर कार्यक्रमांमध्येदेखील फोटो काढण्याचे काम मिळत नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी स्टुडिओच्या जागी ज्यूस विक्री सुरू केली आहे.
-शरद पाटील, फोटो स्टुडिओ व्यावसायिक