Breaking News

‘झिका’ला रोखण्यासाठी उपाययोजना

नवी मुंबई महापालिका करणार घरोघरी जाऊन सर्वेक्षण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोना महामारीविरुद्ध संपूण जग लढत आहे. या लढाईत आता आणखीन विषाणू आपले रुप दाखवत आहेत. असाच झिका विषाणू देशात काही भागात आपले हातपाय पसरू लागला आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात झिका विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळल्याने नवी मुंबई पालिकेकडून ही आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. पालिकेकडून घरोघरी केले जाणारे ताप सर्वेक्षण कार्यवाही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे आयुक्तांनी सूचित केले आहे.

पुणे जिल्ह्यात पुरंदरमध्ये झिका विषाणूची लागण झालेला राज्यातील पहिला रूग्ण आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर पूर्व खबरदारी घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाने विशेष बैठक घेत झिकासह मलेरिया, डेंग्यू आणि पावसाळी कालावधीत होणार्‍या किटकजन्य आणि साथरोगांच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर आणि वेबसंवादाद्वारे सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी सहभागी होते.

झिका विषाणू हा एडिस डासांमार्फत पसरतो व त्याची लक्षणे साधारणत: डेंग्यू आजाराप्रमाणे असतात. ताप, अंगावर पुरळ उठणे, अंगदुखी, सांधेदुखी ही झिका आजाराची सर्वसाधारण लक्षणे असून गरोदर महिलांना हा आजार झाल्यास होणार्‍या बाळाच्या डोक्याचा घेर कमी असण्यासारखे दोष उद्भवू शकतात. त्यामुळे याविषयी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुषंगाने आयुक्तांनी झिका, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरासीस आजार होऊच नये याकरिता अधिक काळजीपूर्वक आणि प्रभावीरित्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले आहेत. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घरोघरी केले जाणारे ताप सर्वेक्षण तसेच डासाचे उत्पत्ती स्थाने याबाबतची सर्वेक्षण कार्यवाही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे आयुक्तांनी सूचित केलं.

एखाद्या ठिकाणी डास झाले आहेत अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर अथवा मलेरिया वा संशयित डेंग्युचे रूग्ण आढळल्यानंतर तेथे डासनाशक फवारणी केली जाते. मात्र याविषयी अधिक दक्षता घेत नागरी आरोग्य केंद्राच्या पथकांनी स्वत:हूनच अशा संभाव्य स्थानांवर नियमितपणे डासअळीनाशक फवारणी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. रूग्ण आढळल्यानंतर कार्यवाही करावीच, मात्र आजार होऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्यात यावा असे आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.

एखादा रूग्ण आढळल्यानंतर प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाते, त्यासोबतच डास उत्पत्ती होऊ शकेल अशा संभाव्य जागांचा शोध सर्वेक्षणाची व्यापकता वाढवून पथकांमार्फत घेतला जावा यादृष्टीने पथकांना लक्ष्य आखून देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी यांना दिले व दर आठवड्याला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपल्याकडे सादर करण्याचे निर्देश दिले. 50 टक्के सर्वेक्षण हे प्रतिसादात्मक व 50 टक्के सर्वेक्षण हे प्रतिबंधात्मक असायला हवे असे स्पष्ट करीत आयुक्तांनी जनतेमध्ये याविषयी व्यापक स्वरूपात माहिती पोहचवावी जेणेकरून त्यांना काळजी घेता येईल असे सूचित केले.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

नागरिकांनी घरांमध्ये तसेच घराभोवती पाणी साचून त्यामध्ये डास उत्पत्ती होणार नाही याकडे लक्ष द्यावे. घरामधील फुलदाण्या, कुंड्यांखालचे व फ्रिज डिफ्रॉस्ट ट्रे, एसी डक्ट, फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी नियमित बदलावे, भंगार साहित्य व टायर्स योग्य प्रकारे नष्ट करावेत, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या झाकून ठेवाव्यात तसेच आठवड्यातून एकदा स्वच्छ करून पूर्ण कोरड्या कराव्यात अशाप्रकारे काळजी घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे मलेरिया, डेंग्यू अथवा इतर साथरोगांची लक्षणे आढळल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात जाऊन त्वरित मोफत उपचार करून घ्यावयाचा आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम प्रभावीरित्या राबविण्यात येत असून नागरिकांनीही डास उत्पत्ती होऊ नये याकरिता काळजी घ्यावी तसेच डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यासाठी अथवा रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी व फवारणीसाठी घर, सोसायटी व परिसरात येणार्‍या महापालिका कर्मचार्‍यांना सहकार्य करावे.

-अभिजित बांगर, आयुक्त, पालिका, नवी मुंबई

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply