उरण : वार्ताहर
नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. यावर्षी शुक्रवारी (दि. 13) नागपंचमी उत्सव आला आहे. त्यामुळे चिरनेर कलानगरातील गोरे कुटुंबांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागदेवताच्या मातीच्या मूर्ती घडविण्याचे काम हाती घेतले आहे. नागपंचमीच्या दिवशी सुहासिनी या आपल्या कुटुंबाला, भावाला सुख-शांती, समाधान, आयुष्य वाढण्यासाठी शेत, मालरानात जाऊन नागाची पूजा करतात. तसेच मातीपासुन बनवलेल्या नाग देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपआपल्या घरात करून पुजा केली जाते व त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. भातशेतीचे नूकसान उंदीर मोठ्या प्रमाणात करत असतात अशा उंदरांपासून शेतीतील पिकांचे रक्षण नाग देवता करत असल्याने नाग हा शेतकर्यांचाही मित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे नागपंचमी उत्सवाचे औचित्य साधून नागदेवताची पुजा मोठ्या भक्तिभावाने करतात. नागपंचमीच्या दिवसाचे औचित्य साधून घरी स्थापना करण्यात येणार्या नागदेवताच्या मातीच्या मूर्ती घडविण्याचे काम हे चिरनेर गावातील कला नगरातील गोरे कुटुंब गेली अनेक वर्षे करत आहेत. या संदर्भात माहिती देताना दिपा गोरे व दिपक गोरे यांनी सांगितले की, नागपंचमी हा सण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागात ही हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. त्यामुळे नाग देवतांच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आम्ही कुटुंब दिड हजार नाग देवतांच्या मूर्ती घडविण्याचे काम हे गेली 20 वर्षे आपल्या कुटुंबासह करत आहोत. नागपंचमी उत्सवाचे औचित्य साधून दोन दिवस अगोदर गावात तसेच मुंबई, दादर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जात असतो. या विक्रीच्या मोबदल्यात मिळणार्या पैशातून आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सहकार्य प्राप्त होत आहे.