Tuesday , February 7 2023

पोलादपूरचा वर्षा पर्यटन र्हास

हिरवा शालू पदर।शिरावर घेऊनी जरतारी।

चालली सावित्री सासरी॥

डोंगर-राने मार्गी आडवी।काटे खड्डे पायी तुडवी।

कडे कपारी उडी घेऊनी।निघे पुढे सत्वरी।

चालली सावित्री सासरी॥

’सोनपंखी’कार वसंत पालकर यांनी पोलादपूर तालुक्यातील मुख्य नदी सावित्रीचे केलेले हे वर्णन घोडवनी, कामथी, चोळई, ढवळी या अन्य नद्यांबाबतही साम्यदर्शक आहे. 25 जुलै 2005च्या अतिवृष्टी, भूस्खलन आणि महापुराच्या आस्मानी संकटानंतरही या निसर्गसौंदर्याला कुठेही बाधा आलेली दिसत नव्हती. खेडोपाडी जाणारे रस्ते आजही जरी या आपत्तीतून सावरलेले नसले, तरी छोट्या गाड्यांतून तालुक्यांतील ‘टुरिस्ट स्पॉट’पर्यंत जाणे अवघड नव्हते. अशातच, 22 जुलै 2021 रोजी पोलादपूर तालुक्यात तब्बल 384 मिमी पाऊस पडला आणि जागोजागी डोंगर कोसळले. सर्वच नद्यांचे प्रवाह रौद्रावताराने पात्र सोडून  वाहू लागले. पोलादपूरनजीकच्या घागरकोंड येथील खास वर्षा पर्यटनाचे आकर्षण केंद्र असलेला झुलता पूल वाहून गेला. त्यामुळे आता द्राविडी प्राणायामसारखा वळसा घालून कापडे व पितळवाडीतील बाजारपेठेसाठी येथील लोकांना जावे लागणार आहे.

पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळापासून काही किलोमीटर अंतरावरील खोपड आणि चांदकेदरम्यानच्या मोरझोत धबधब्याभोवती लालमातीचे डोंगर उभे राहिल्याने हा मार्ग बंद झाला आहे. मोरझोत धबधबा जरी आज अतिवृष्टी थांबल्यानंतर शुभ्रधारांनी कोसळत असला तरी अतिवृष्टीकाळात रौद्ररूपात लाल होऊन आदळत होता. येथील दरडी हटविण्यासोबतच धबधब्यासमोरची मोरी  पुन्हा मजबूत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ब्रिटिशकालीन हिलस्टेशन अशी नोंद असलेल्या पोलादपूर तालुक्यामधील कुडपण येथील अतिवृष्टी परिसरातील पर्यटनस्थळांना धोका पोहोचविणारी नसली, तरी ग्रामीण जनजीवनाचे फार मोठे नुकसान करणारी ठरली आहे. कुडपण बुद्रुक आणि कुडपण खुर्द येथे शेती आणि लोकवस्तीचे जास्त नुकसान झाले आहे. भातशेतीची जमीन वाहून गेली आहे आणि शेतीचे बांध फुटले आहेत. नदीमुळे गावालगत आरसीसी. संरक्षण भिंत उभारण्याची आवश्यकता आहे. कुडपण बुद्रुकमधील पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या वाहुन गेल्या आहेत. कुडपणच्या पहिल्या वाडीवर दोन घरांचे नुकसान झाले आहे, तर डोंगरमाथ्यावरील जमिनीला अनेक भेगा पडल्या असून भूस्खलन होत आहे. नदीच्या प्रवाहालगतचा रस्ता वाहून गेल्याने नव्याने संरक्षक भिंतीसह रस्ता बांधण्याची गरज आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील शौचालय, तसेच बांध वाहून गेला आहे. शेलारांच्या कुडपण येथील आणि तीन नद्यांच्या संगमावरील सिमेंटबंधारा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. भराडी नदीवरील एक पूल पडला आहे, तसेच मधल्या कुडपण येथील एक जुना पूलही कोसळला आह, मात्र आजही कुडपण या मिनी महाबळेश्वर हिलस्टेशनचे सौंदर्य अबाधित आहे.

महादेवाचा मुरा हे गोवेले आणि बोरघर ग्रामपंचायतींमध्ये विभागलेले गाव अद्याप पायी रस्त्याने बिकटवाटेचे असून जिल्हा परिषदेने क दर्जाचे पर्यटनक्षेत्र म्हणून नोंद करूनही अद्याप येथे कोणताही विकास साध्य झाला नाही. या दोन्ही ग्रामपंचायती मुख्यमंत्री सामाजिक ग्रामविकास अभियानात असूनही महादेवाचा मुरा उपेक्षित राहिल्याने या गावाची जबाबदारी पोलीस अधीक्षकांकडे दिली गेली होती. याखेरीज देवळे येथील शंकर मंदिराला देखील पर्यटनाचा क दर्जा प्राप्त असून यंदाच्या पावसाळ्यामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. श्रावण महिन्यामध्ये भाविकांना या ठिकाणी मोठी कसरत करावी लागत आहे.

पोलादपूर तालुक्याच्या वर्षासहली दरम्यान, पर्यटकांना मोर, लांडोरी, रानकोंबडे आणि भेकरांचे दर्शन वनपर्यटनाचाही अनुभव देऊन जात असतो. येथील प्रदूषणविरहित शुद्ध हवेत फिरताना पर्यटक अधिक तजेलदार होतात. याखेरीज, प्रदूषणविरहित गोड्या पाण्यातील वांब, सकला, कटला, मुरगी, अहिर, खडशी, भिंग, मळ्याचे मासे, शिंगट्या, टोलकी, डाकू मासा, शिवड्याचे पातं, किरवी किंवा मुरी, मुठे (पांढरी खेकडी), झिंगे, चिंबोरी (लाल खेकडी) असे मासे व अष्टपाद उभयचर मांसाहारी पर्यटकांच्या जीभेवर वेगळीच अवीट चव रेंगाळत ठेवतात, मात्र अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील नद्यांमध्ये या जैवविविधतेपैकी काहीच उरले नसल्याचे दिसून आले आहे.

दरवर्षी आषाढात आणि श्रावणात गर्दी करणारे पर्यटक यंदा आपत्तीपर्यटन करण्यास आले, तर त्यांनी मदतीचा हात देण्याचीही गरज आहे. नजीकच्या काळात पोलादपूर तालुक्यातील सर्व वर्षापर्यटनाची स्थळे तातडीने पूर्वस्थितीत आणण्यासाठी विकसित केली पाहिजेत. आतापेक्षा जास्त सुविधांची तरतूद यामुळे करता आली, तर पोलादपूर तालुक्याला पर्यटनविकासातून रोजगार संधी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण होणार आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply