Breaking News

पनवेलमधील ज्वेलर्स मालक, कारागिरांची फसवणूक

पनवेल : वार्ताहर

सोन्याचे दागिने बनवून देणार्‍या मुंबईच्या झवेरी बाजारातील सामंतो बंधुंनी पनवेल भागातील ज्वेलर्स मालक आणि सहा कारागिरांकडून दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने तब्बल सहा किलो 749 ग्रॅम 770 मिली ग्रॅम शुध्द सोने घेऊन त्यांना त्यांचे सोने अथवा सोन्याचे दागिने न देता सुमारे तीन कोटी आठ लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी सामंतो बंधुविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार सचिन चव्हाण यांचे पनवेल भागात रेणुका ज्वेलर्स नावाचे दुकान असून त्यांनी एप्रिल 2019 मध्ये सुब्रतो मंडल या कारागिराच्या माध्यमातून मुंबईतील झवेरी बाजार येथील उत्तम सामंतो आणि गौतम सामंतो या दोघांना दागिने बनविण्यासाठी दोन किलो 30 ग्रॅम वजनाचे शुध्द सोने दिले होते. सामंतो बंधुंनी त्यांच्याकडे इतर दागिन्यांची ऑर्डर असल्याचे कारण सांगत चव्हाण यांना दागिने बनवून देण्यास टाळाटाळ केली. मात्र, चव्हाण यांनी वेगवेगळ्या कारागीरांना तीन कोटी आठ लाख 45 हजार रुपये किंमतीचे तब्बल सहा किलो 749 ग्रम 770 मिली ग्रॅम वजनाचे 99.50 प्रतीचे शुध्द सोने दिले होते. या सर्व कारागिरांनीसुध्दा मुंबईतील झवेरी बाजारातील सामंतो बंधुंच्या कारखान्यातच दागिने बनविण्यासाठी दिले होते. तसेच या सर्व कारागिरांना सामंतो बंधु वेगवेगळी कारणे सांगून त्यांना तयार केलेले दागिने देण्यास टाळाटाळ करीत होते.

मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याचे कारण सांगत सामंतो बंधुंनी कारखाना चालू होताच त्यांचे सोन्याचे दागिने बनवून देण्याचे आश्वासन दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरदेखील सामंतो बंधुंनी सचिन चव्हाण आणि इतर कारागिरांचे सोने अथवा दागिने दिले नाहीत. तसेच त्यांचे फोन घेणे सुध्दा त्यांनी बंद केले. सामंतो बंधुंनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन चव्हाण यांनी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करुन या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेले उत्तम विष्णु सामंतो आणि गौतम विष्णु सामंतो या दोघा भावांचा मुंबईतील झवेरी बाजारात दागिने बनविण्याचा कारखाना आहे. त्याच्याकडे दागिने बनविण्यासाठी दिलेले सोने परत मागण्यासाठी जाणार्‍या कारागिरांना तो दमदाटी करीत असल्याचे तसेच या दोघा भावांनी अशाच पध्दतीने 10 ते 15 ज्वेलर्स आणि कारागिरांकडून सोने घेऊन त्यांची सुध्दा फसवणूक केल्याचे सचिन चव्हाण यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply