Breaking News

वेड घेऊन पेडगावला जाणारे…!

लोकसभेच्या निवडणुका आता शेवटच्या टप्प्यांत आल्या आहेत. सर्वत्र प्रचाराचा धुरळा प्रचंड प्रमाणात उडतोय, त्यातच नेत्यांची एक एक भाषणे याच धुरळ्याला वेगवेगळे रंग देत आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने अर्थ काढून असलेली नसलेली पाजळण्याचा प्रयत्न करतोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील आणि महायुतीचे तमाम नेते यांनी जो प्रचाराचा जबरदस्त झंझावात निर्माण केला आहे त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची प्रचंड दाणादाण उडाली आहे. भरीस भर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर आणि अकलूज येथे जी प्रचंड जाहीर सभा झाली आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि सहकार सम्राट विजयसिंह मोहिते पाटील यांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्यामुळे विरोधकांची तर दातखिळीच बसली आहे. अ अ च्या म्हणजे अहमदनगर-अकलूजच्या महायुतीच्या जाहीर सभांमुळे विरोधक तत पप करू लागले आहेत. त्यामुळे घटनात्मक पदे भूषविणारे विरोधकही स्वतः काय बोलतात याचं भान राहिले नाही, असं सांगण्यात येत आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असून ते विधानसभेचे सदस्य आहेत. पक्षांतर प्रतिबंधक कायद्याच्या अस्तित्वामुळे आणि विधानसभेची मुदत अजून सहा महिने असल्याने विखे-पाटील हे सरळ भाजपच्या व्यासपीठावर जाऊ शकत नाहीत, पण ते व्यासपीठाच्या आसपास होते. दुसरीकडे विजयसिंह मोहिते-पाटील हेही माढाचे विद्यमान खासदार असल्याने ते थेट भाजपचे सदस्यत्व स्वीकारू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिहांचा दादा म्हणून आदरार्थी उल्लेख करून त्यांच्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनातील महत्त्वपूर्ण मौलिक योगदानाबद्दल व्यासपीठावर सत्कार, सन्मान, बहुमान केला. भारताच्या लोकप्रिय पंतप्रधानांनी केलेल्या एका ज्येष्ठ संसदपटूचा सत्कार होता, पण डोळ्यावर पिवळ्या रंगाचा चष्मा लावलेल्या विरोधकांना, ज्यांनी घटनात्मक शपथ घेऊन कधी काळी महत्त्वाची पदे भूषविली त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटील आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश का केला नाही? असा सवाल करून आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन केले अशीच चर्चा आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करून ते अहमदनगरहून लोकसभा निवडणूक लढवताहेत, तर विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आगामी विधानसभेची तयारी करतानाच रणजीतसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या माढाच्या उमेदवारीला भरभक्कम समर्थन दिले आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे काँग्रेस पक्षातील विरोधकांनी या निमित्ताने विखे-पाटील यांच्यावर आरोप केले नाहीत तरच नवल. राजकारण, युद्ध आणि प्रेम यात सारे काही क्षम्य आहे, सारे काही योग्य आहे हे एकदा मान्य केल्यानंतर आपल्या डोक्याला ताण देण्याची गरज नाही, पण काही लोकांना डोकं खाजवीत बसायची सवय जडलेली असते त्याला काय करणार? जाणत्या राजाकडून आपला तो बाळ आणि दुसर्‍याचं ते कार्ट अशी जर ऐंशीव्या वर्षात भूमिका घेतली असेल आणि दुसर्‍यांची पोरं सांभाळायचा काही ठेका घेतला आहे काय? असा जर विचार केला असेल, तर ठाकरे, मुंडे, तटकरे आणि अन्य घराण्यांच्या ज्या ज्या लोकांनी जाणत्या राजावर विश्वास टाकलाय त्या लोकांचं देव भलं करो, एवढंच म्हणणं आपल्या हाती आहे. विरोधकांमधल्या बोलघेवड्या नेत्यांबद्दल काय बोलणार? आपण काय बोलतो? आपण सत्तेवर असताना काय केलं? याचा अंतर्मनाशी विचार करण्याची सुबुद्धी परमेश्वर त्यांना देवो. प्रार्थना करणे आपल्या हातात आहे. त्यामुळे या लोकांनी ‘वेड घेऊन पेडगावला’ जाण्याची जी भूमिका घेतली आहे त्याचा महाराष्ट्रातली जनता योग्य तो विचार केल्याशिवाय राहणार नाही.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि कायदेपंडित प्रकाश आंबेडकर यांनी अखिल भारतीय मजलिस ए झोहादुल मुसलमीन अर्थात एआयएमआयएम या पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्याबरोबर आघाडी करून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान तथागत गौतम बुद्ध यांचा धर्म अंगिकारला आहे. हिंदू धर्मात बुद्ध हाही भगवान विष्णूचा अवतार मानण्यात आला आहे आणि दशावताराच्या आरतीत बौद्ध कलंकी कलियुगी अधर्म हा अवघा, सोडुनि दिधला धर्म म्हणुनि न दिसशी देवा! असे स्पष्ट म्हटले आहे, पण एखादी गोष्ट मान्य करायचीच नाही असे पक्के मनाशी ठरविले असेल, तर त्याला आपण काय करणार? असो! तर मुद्दा हा आहे की असदुद्दीन ओवेसी हे औरंगाबाद येथे आले आणि त्यांनी बुद्धविहारला जाण्याचे, तसेच भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्याचे टाळले. तिथले उमेदवार धावत गेले आणि अभिवादन करून येत सारवासारव करू लागले. ओवेसी यांची ही कृती प्रकाश आंबेडकर यांना मान्य आहे का? त्यांनी यावर प्रतिक्रीया का दिली नाही? की मुद्दाम टाळाटाळ केली? की केवळ सोयीचं तेवढेच पाहणार? इस्लाममध्ये मूर्तिपूजा मान्य नाही म्हणून ओवेसी यांनी बुद्धांना अभिवादन केले नाही, असे सांगण्यात येते मग सारवासारव करणारे इम्तियाज जलील का अभिवादन करून आले? ते इस्लाम मानत नाहीत का? ते मुस्लीम नाहीत का? की केवळ मतांसाठी इम्तियाजभाईंनी बौद्धांना समाधान मिळावे म्हणून ही धावपळ केली? या प्रश्नांची उत्तरे संबंधितांनी आपापल्या मनाशीच द्यावीत. 1947 साली आपण स्वतंत्र झालो, पण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरम् हा मंत्र महत्त्वाचा होता आणि तो मंत्र स्वातंत्र्यसैनिकांनी अंगिकारून हौतात्म्य पत्करले. अनेक स्वातंत्र्यसैनिक आज शंभरीच्या घरात आहेत. त्यात मुस्लिमही आहेत, पण त्यांनीही वंदे मातरम् अंगिकारले होते. परभणीच्या एका मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकाचा तर वंदे मातरम्ला सन्मान देणारी मुलाखत दैनिक ‘सामना’ने प्रसिद्धही केली होती, पण केवळ मतांचं राजकारण करणार्‍या अशा नेत्यांना कोण बोलणार?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर काँग्रेस आघाडी सरकारने घाईघाईत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक मंजूर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. आज महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आहे, पण परवा बारामतीत भाषण करताना अजित पवार काय बोलून गेले? ‘बारामतीला दृष्ट लागू नये म्हणून बाहुली उलटी टांगून ठेवा!’ आता हे वाक्य बोलण्याच्या ओघात अजितदादा बोलून गेले, पण हे वाक्य अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा भंग करणारे नाही का? मग अजित पवार यांच्यावर कोण आणि कशी कारवाई करणार? बरे, माफी मागितली की प्रश्न मिटला. शरद पवारांनी मागे दोन वेळा मतदान करण्याचा सल्ला जाहीर भाषणांतून दिला होता. त्याचे काय? निवडणूक आयोगाकडे माफीनामा सादर केला की पुन्हा मोकळे. आमचे एक मित्र अंबरनाथचे जुने शिवसैनिक प्रकाश सुळे यांच्याशी चर्चा करीत असताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणतात, अहो त्रिवेदी, काँग्रेसच्या राहुल गांधींपासून खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत भाजपवर आरोप करताहेत. या खोट्यानाट्या आरोपांना भाजपवाले प्रत्युत्तर का देत नाहीत? खरे आहे. ज्या प्रमाणात खोट्यानाट्या आरोपांना उत्तरे देण्याची गरज आहे त्या प्रमाणात होत नाही. 30 हजार कोटी जर अनिल अंबानींना मिळाले असते, तर मुकेश अंबानींना 458 कोटी रुपयांची मदत अनिल अंबानींनी करण्याची आवश्यकता भासली असती का? असा सर्वसामान्यांमधून प्रश्न करण्यात येतो. खोटे बोल पण रेटून बोल अशा विरोधकांचा खाक्या आहे. त्यांना मुंहतोड जबाब भाजपकडून देण्याची गरज आहे. राहुल गांधी राफेल राफेल असे बेंबीच्या देठापासून ओरडताहेत मग त्यात जर तथ्य नाही तर त्यांना प्रतिबंध कोण करणार? राफेल म्हणजे राहुल फेल असं म्हटलं जातं, पण जर चुकीचे आरोप करून जर असे नेते मोठे होण्याचा प्रयत्न करीत असतील, तर त्यांना ताळ्यावर आणायची गरज आहे आणि देशातली जनता अशा नेत्यांना ताळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. वेड घेऊन पेडगावला जाणार्‍यांबद्दल काय बोलणार? मतपेटीतून उत्तर देऊ या! सर्वांनी 100 टक्के मतदान करू या!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

नवकेतन फिल्म @ 75 : चित्रपट इतिहासातील मानाचे स्थान

मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी मराठी चित्रपटांचे विशेष खेळ महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये आयोजित …

Leave a Reply