रेवदंडा : प्रतिनिधी
प्रिझम सामाजिक विकास संस्थेने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने अलिबाग तालुक्यातील नागाव येथील प्रसिद्ध हटाळा बाजार परिसरात पथनाट्य सादर करून मतदानाविषयीजनजागृती केली.
निर्वाचन आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम 2022 राबविण्यात येत असून भारतीय लोकशाही अधिकाधिक निकोप बनविण्यासाठी नागरिकांना मतदान कार्यातील सहभाग अधिक वृद्धिंगत होणे अपेक्षित आहे. याच उद्देशाने रायगड जिल्ह्यात विविध माध्यमांद्वारे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यानुसार, नागाव हटाळा बाजार परिसरात प्रिझम संस्थेच्या वतीने मतदान आपली जबाबदारी या शीर्षकांतर्गत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.
या पथनाट्यात प्रिझम संस्थेचे प्रतिक कोळी, प्रसाद अमृते, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, तुषार राउळ यांनी कलाकार म्हणून सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, नागावचे सरपंच निखिल मयेकर, ग्रामपंचायत सदस्या हर्षदा मयेकर, सदस्य राकेश मोरे, तलाठी उदय देशमुख, पोलीस पाटील संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते यज्ञेश पाटील यांच्यासह स्थानिक आणि बाजार ग्राहक उपस्थित होते.