Breaking News

जगी जीवनाचे सार

सत्यनारायणाची महापूजा आणि प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गीत एक समीकरण बनून गेले आहे. ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे भक्तिगीत वाजले की हमखास पुढचे जीवनाचे सार सांगणारे गीत येते ते म्हणजे ‘जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ त्यापुढे ज्ञानी असो की अज्ञांनी गती एक आहे जाण, मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान, सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, मना खंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण…

हे प्रबोधन करणारे गीत कानाला भविष्य काळात सुकर्म करण्याची जाणीव करून देते आणि तेवढ्यापुरते का होईना जीवन जगण्याचा अर्थ प्रत्येकाच्या मनावर बिंबला जातो, मात्र सत्यनारायणाची महापूजा संपली की दुसर्‍या दिवशी जगी जीवनाचे सार, सार सार विसरून, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर, याही ओळी विसरल्या जातात. आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपण केलेल्या कर्माची फळे भोगण्याची पाळी मानवावर येते.

जीवन क्या है, चलता फिरता एक खिलोना है, दो आंखो में एक हंसना एक रोना है, जो जी चाहे वो मिल जाए, कब ऐसा होता है, हर जीवन, जीवन जिने का समझोता है, अब तक जो होता आया है, ओ ही होना है जीवन क्या है।

रात अंधेरी भोर सुहाना यही जमाना है, हर चादर मै दुख का ताना सुख का बाना है, आती सांस को पाना जाती सांस को खोना है, जीवन क्या है चलता फिरता खिलोना है।

असा जीवनाचा अर्थ सागणार्‍या ओळी आहेत, गंगेत डुबकी मारून जरी तीर्थ केलेत हजार, तरी त्याने काय होणार जेव्हा आपण बदलणार नाही आपला दृष्टिकोन व विचार, असा सुविचार आहे. जन्माला आला आहेस थोडं जगून बघ. जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ, अशा ओळी ऐकण्यास सोप्या असल्या, तरी जीवन जगताना काय कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्याचा प्रत्यय ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो त्यालाच त्या शब्दांचा अर्थ पोळून कळतो. तर हम दोनो या हिंदी सिनेमात साहीर लुधियानवी यांच्या  मै जिंदगी का साथ निभाता चला गया या गीताला अजरामर केले ते थोर गायक मोहम्मद रफी साहेब यांनी व संगीतकार जयदेव यांनी.ते गीताचे बोल कानावर पडले, तर जीवन जगण्याची नवीन उमेद निर्माण होते. त्या उलट कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, बात निकाली तो हर एक बांत पे रोना आया, असे खट्टे मिठ्ठे बोल ही जीवनात अनुभवास येत असतात.

एक कव्वाली आहे. साधारणतः 1970च्या दशकातील. आजसुद्धा ती ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. शायर  रत्नागिरवी यांचे शब्द आणि मशहूर कव्वाल अझीझ नाझा यांची गायकी यांचा सुरेल संगम या कव्वालीमध्ये दिसून येतो. कव्वाली हा इस्लामिक गायन प्रकार. त्याची भाषाही उर्दू; पण तरीही भाषेच्या, धर्माच्या भिंती तोडून कव्वालीने भारतीय मनावर पकड मिळवलेली आहे. सिनेमा व उरुसामधून कव्वाली ऐकण्याची मजा काय औरच असते. गायनाची वेगळीच धाटणी, विशिष्ट आवाज, चाल म्हणून कव्वाली लक्ष वेधते. अल्लाहच्या नावाने कव्वाल्या गायल्या जात असल्या, तरी प्रेम रस, जीवनाचे सार सांगणारे गायन, मित्र प्रेम, मुहब्बत व झुम बराबर झुम शराबीसारखी कव्वाली दारूची महती सांगणारी आहे. चढता सुरज धीरे धीरे या जीवनाचे सार सांगणार्‍या कव्वालीला एका सुभाषितकाराने मोहक शब्दात बसविले आहे. माणूस आपल्या काहीशा यशाने अहंकारी बनतो. इतरांना तुच्छ लेखतो, पण ते काही शाश्वत नाही. कधी ना कधी त्याचा अंत होतोच. पृथ्वीवर जो जन्माला येतो त्याला एक दिवस इथून जावेच लागते आणि जसे तो येताना काही घेऊन येत नाही, तसेच जातानाही काहीच नेत नाही. हाच भावार्थ या कव्वालीत आहे. चढता सुरज ही कव्वाली ऐकण्यास सुमधुर आहे, तशीच त्याच्या शब्दांची ठेवणही जीवनाला अर्थ देणारी आहे. त्याची आधी चाल आणि नंतर शब्द भावतात.

शाहिराने पहिल्याच शेरमधे सगळा अर्थ  सांगून टाकला आहे.

हुये नामवर बेनिशाँ कैसे-कैसे। जमीं खा गई, नौजवान कैसे-कैसे। आज जवानी पर इतराने वाले, कल पछताएगा, चढता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जायेगा॥

कितीही मोठे नांव असले, कितीही कीर्ती मिळवली आणि कितीही सत्ता, पैसा, ताकद मिळवली तरीही शेवटी एक दिवस त्यातील काहीच राहत नाही आणि नंतर तर लोकं त्याचे नांवही लक्षात ठेवत नाहीत हाच सुरुवातीचा अर्थ आहे. जगात अनेक राजे रजवाडे, आले नि गेले. आज जर कुणाला त्यांच्याबद्दल विचारले तर कित्येकांना त्यांचे कर्तृत्वचं काय पण नावही माहीत नसते. बाबारे… जरी आज तू तरुण, बलवान, धनवान असलास, तरी त्याचा गर्व करू नकोस… उद्या तुला पश्चताप करावा लागेल. दुनियेची ही रीतच आहे की दिवसा उगवणारा सूर्यदेखील संध्याकाळी मावळतोच. तू इथे फक्त एक यात्रेकरू आहेस. हा मृत्युलोक आहे आणि इथे माणसाचे जीवन हे फक्त काही दिवसांचेच असते. इथे तुला कितीही लोकं मिळू दे, जमीन मिळू दे, धनदौलत मिळू दे. यातील काहीच शेवटी तुझ्याबरोबर येणार नाही. तू जसा येताना रिकाम्या हाताने आलास तसाच रिकाम्या हाताने जाणार आहेस, पण तरीही हे सगळे मान्य केले जात नाही. आजची भोवतालची परिस्थिती पाहून वृथा अभिमान केला जात आहे. या सगळ्यात इतका गुरफटला आहे की, ईश्वराच्या अस्तित्वाचेही स्मरण राहिले नाही. जो एखादी गोष्ट मिळवतो त्याला एक दिवस ती गमवावी लागतेच. ज्याला ही गोष्ट समजली त्याला जीवनाचे काहीच मोल राहत नाही; आणि मग तो परत या जीवन-मृत्यूच्या फेर्‍यात अडकू नये यासाठी प्रयत्नशील होतो.  एक दिवस तर या पृथ्वीचेही अस्तित्व संपणार आहे. मग कोणत्या मोहात अडकत आहेत? प्रत्येकजण भविष्याच्या चिंतेत अडकलेला आहे, जीवन काय आहे याची उमग झाली नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. नेहमीच्या चिंतांमध्ये अडकल्यावर परत संधी मिळेलच याची शाश्वती नाही. अजूनही बेसावधपणे झोपून वेळ दवडू नकोस. नाहीतर सावरण्याचाही वेळ मिळणार नाही… मृत्यूने आतापर्यंत अनेक लोकांचा अंत केला आहे. ज्यावेळेस सिकंदर पृथ्वी जिंकण्यास आला त्यावेळेस त्याच्यात हिंमत, झुंजारपणा याची काहीच कमी नव्हती, पण ज्या वेळेस त्याचा अंत झाला त्या वेळेस त्याला जिंकलेल्या गोष्टींपैकी कोणतीच गोष्ट सोबत नेता आली नाही. दुष्ट आणि सगळ्यांचा कर्दनकाळ ठरणारा हलाकू आणि त्याचे साथीदार राहिले नाहीत की शूर लढवय्या पौरसही राहिला नाही. त्यांची धनदौलतही राहिली नाही. पूर्वी हे जे राजे शहेनशाह अगदी आढ्यतेने चालायचे आज त्यांच्या कबरीवर साधा दिवाही तेवत नाही. लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकालाच एक दिवस जायचे आहे, सगळ्यांचे शेवटचे ठिकाण हे पंचतत्वात विलिनीकरण हेच तर आहे. तुम्ही जसे कराल, जे पेराल तेच नंतर उगवणार आहे. तोंड वर करून चालत राहिलात, तर ठेच ही लागणारच. मृत्यू हा तर सगळ्यांनाच येणार आहे. त्यापासून आजपर्यंत कुणीच सुटलेले नाही. आत्मा शरीरातून निघून गेला की शरीराचे कोणतेच नाते राहत नाही. आई-वडील असो वा भावंड किंवा बायको,  मुलं सगळेच दूर होतात. ज्यांना तुम्ही भाऊ म्हणतात तेही इतरांसारखेच बनतात आणि जी काही धनदौलत तुम्ही कमावली आहे ती तर घेऊन टाकतातच, पण त्याच्या बदल्यात आपल्याला फक्त काही मीटरचे कफन देतात. ज्यांना मित्र, परिवार म्हणतो ते तेवढ्यापुरतेच असतात. ज्या वेळेस मृत्यू होईल त्या वेळेस फक्त स्वतःलाच जायचे आहे आणि हे सगळे लोकं फक्त काही पावले बरोबर असतील आणि नंतर आपापल्या मार्गाने निघूनही जातील. पार्थिव असेल ते कबरीत टाकून त्यावरच स्वतःच्या हाताने माती टाकणारे हे लोकं नंतर काही दिवसातच पूर्णतः विसरून जातील. यांनाच  सगेसोयरे म्हणतो? आज जर वर्तन सुधारलं, तर उद्या जेव्हा देवाच्या दरबारात उभा राहशील त्या वेळेस त्रास होणार नाही. कोणास ठावे उद्या कसा येईल? शेवटी मोकळ्या हातानेच जायचे आहे. पैशाने या गोष्टी विकत घेता येत नाहीत. त्यासाठी सद्वर्तन महत्त्वाचे आणि गरजेचे असते. असे या कव्वालीत जीवनाचे सार  आहे. मरताना काहीच नेऊ शकणार नसाल, तर मग हा सगळा खटाटोप कशासाठी? पण नेमका माणूस हेच विसरून जातो. पैशाच्या आणि संपत्तीच्या मोहात अनेक अनैतिक गोष्टी करतो आणि स्वतःचा शेवट वाईट करून घेतो. असे म्हणतात की, माणूस मेल्यावर त्याच्या कर्तृत्वाने जिवंत राहतो, पण त्यासाठी त्याने चांगले वर्तन केले पाहिजे. प्रत्येकाने आपले वर्तन सुधारले पाहिजे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नामाची महती, हे प्रभू तुझ्या नामाचे ध्यान केले असता सुख, दया, जीवन धन मिळते. तू ज्ञानी व अंतरज्ञानी आहेस, तुझी कृपा झाल्यास बिघाडलेला सरळ मार्गावर येतो अशा अर्थानं केली आहे. प्रभो तेरो नाम जो ध्याय फल पाए। सुख लाय तेरो नाम तेरी दया हो जाए तो दाता  जीवन धन मिल जाए॥

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply