Monday , February 6 2023

नैना परिक्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे सिडकोला निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

नैना क्षेत्रातील सर्व अवैध इमारतींना तसेच सुरू असलेल्या अवैध बांधकामांवर कडक कारवाई करण्यात यावी. नैना परिक्षेत्रातील समाविष्ट गावांमधील इमारतीमधील सदनिका या इमारतीस वैध परवानगी असल्यासच सदनिकांची दस्त नोंदणी करावी अशा प्रकारच्या सूचना संबंधित दुय्यम निबंधकांना देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील पनवेल महानगरपालिका क्षेत्रालगतच्या गावांचा समावेश नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रामध्ये (नैना) करण्यात आला असून, या गावांतील बांधकामाकरीता नैना प्राधिकरणाची नियोजन प्राधिकरण म्हणून शासन, नगर विकास विभागाच्या 10 जानेवारी 2013च्या अधिसूचनेद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे याची आपणांस कल्पना आहेच.

नैना अधिसूचित क्षेत्रामध्ये नैना प्राधिकरणाची पूर्व परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. तथापि, पनवेल महानगरपालिका क्षेत्रास लागून असलेल्या, पालीदेवद, आदई, आकुली, देवद, विध्रुवे, उसी व डेरवली या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैना प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता, इमारत बांधकामे सुरू असून काही यापूर्वीच पूर्ण झाली असून, त्यांतील सदनिकांची दस्त नोंदणी, दुय्यम निबंधक कार्यालयातील संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयास, अवैध बांधकामातील सदनिकांची नोंदणी थांबण्याबाबत कळविण्यात आले नसल्याने अशी नोंदणी अजुनही सुरू आहे.

नैना प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता केलेले बांधकाम हे अवैध आहे, तसेच त्याची रितसर दस्त नोंदणी होत आहे, हे माहीत असूनही केवळ स्वस्त असल्याने गरीब मध्यमवर्गीयांकडून सदनिका खरेदी केली जात आहे व पर्यायाने गरीब मध्यमवर्गीय कुटुंबाची राजरोसपणे फसवणूक होत आहे. यास सक्षम प्राधिकरण म्हणून सिडको (नैना) प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. तथापि, अशी कारवाई होत नसल्याने, सिडको प्रशासनाचा अधिकृत महसुल बुडत आहे व अनधिकृत बांधकामदारांचे फावत आहे.

या सर्व प्रकारात आळा घालण्यासाठी प्रशासकीय प्रमुख या नात्याने, नैना क्षेत्रातील सर्व अवैध इमारतींना तसेच सुरू असलेल्या अवैध बांधकामांवर कडक कारवाई करण्यात यावी. नैना परिक्षेत्रातील समाविष्ट गावांमधील इमारतीमधील सदनिका सदर इमारतीस वैध परवानगी असल्यासच सदनिकांची दस्त नोंदणी करावी अशा प्रकारच्या सूचना, संबंधित दुय्यम निबंधकांना देण्यात यावी. या संदर्भात उसर्ली (ता. पनवेल) येथील गामस्थांनी आपल्या कार्यालयास पत्र व्यवहार केला आहे. कार्यवाही करण्यात आल्यावर अवगत करावे, असे नमुद केले आहे.

Check Also

सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर …

Leave a Reply