उरण : प्रतिनिधी
मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्र किनारा हा पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. मुंबईतील समुद्र किनारे हे गर्दीच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तेथील समुद्र किनारे सोडले तर पर्यटकांना उरण पिरवाडी समुद्र किनारा हा जवळचा आहे. त्यामुळे या नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कर्जत, खोपोली या परिसरातील तसेच स्थानिक उरण परिसरातील जनता पर्यटनासाठी येत आहे.
उरणला तसे चारी बाजूने समुद्राने वेढलेले आहे, परंतु पिरवाडी समुद्र किनारा हा निसर्गसंपन्न डोंगर कुशीत आहे. समोरच पूर्वेला द्रोणागिरी हा भला मोठा डोंगर उभा आहे.आजूबाजूला परिसरही गर्द झाडीने भरलेला आहे. तसेच समुद्राचे पाणी ही नितळ असल्याने पर्यटक आपला आनंद पाण्यामध्ये मनमुरादपणे लुटत आहेत. लहान मुले तसेच मोठी मंडळीही वाळूमध्ये खेळण्याचा आनंद लुटत आहेत. मनमोकळेपणाने आनंद लुटण्यास मिळत असल्याने पर्यटकांचा ओढा या उरणच्या पिरवाडी समुद्रावरील बीचकडे वाढत आहे.
सद्यस्थितीत या उरणच्या पिरवाडी बीचकडे पर्यटकांचा ओढा वाढत असताना इथे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तसा विकास झालेला नाही. बीचकडे दुर्लक्ष झालेले आहे. काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. या बाबींकडे जर शासनाने लक्ष केंद्रित केले व हा पिरवाडी समुद्रकिनारा जर सुसज्ज बनविला, तर आणखी पर्यटकांचा ओढा या समुद्रकिनार्यावर वाढला जाऊन स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होऊन आणखी कुटुंब यावर चालतील. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.