Breaking News

पूर येणार्‍या जागेतच दिले जातात बांधकाम परवाने

महाड : प्रतिनिधी

महाडसह संपूर्ण कोकणात या वर्षी महापुराने विळखा घातला. यामध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतरही शहरातील सातत्याने पूर येणार्‍या भागात बांधकामे कशी होतात, असा प्रश्न पुढे आला आहे. सन 2005 नंतर पूररेषा निश्चित केली गेली आहे. या वर्षी आलेल्या पुरामध्ये या इमारती किमान सात दिवस पाण्याखाली राहून मानवी जीविताला धोका निर्माण झाला होता. दिवसा पाणी आल्याने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही, मात्र कष्टाच्या पैशातून घर घेताना काळजी घेणे गरजेचे बनले आहे. महाड शहरामध्ये लोकसंख्या वाढत चालली असून शहर विस्ताराला पुरेशी जागा शिल्लक राहिलेली नाही. उर्वरित दस्तुरी नाका, कोटेश्वरी, पंचशील नगर, शेडाव नाका, गांधारी आदी भाग हे दर पावसाळ्यात पुराच्या पाण्याखाली असतात. शिवाय या भागातील अनेक जमिनी या आरक्षित आहेत. असे असले तरी नियम आणि अटी धाब्यावर बसवून या भागात इमारती उभ्या करण्याचे काम केले जात आहे. महाड शहरातील दस्तुरी नाका ते नाते खिंड हा भाग सतत पाण्याखाली असून देखील या ठिकाणी भौगोलिक स्थितीचा आढावा न घेताच इमारत परवाने जिल्हाधिकारी आणि नगर रचना विभागाने दिले आहेत. हीच स्थिती ग्रामीण भागात देण्यात आलेल्या परवान्यांबाबत देखील निर्माण झाली आहे. याच परिसरात रुग्णालयांना देखील परवाने दिले आहेत. वारंवार येणार्‍या पुरामध्ये रुग्णालयातून पूर काळात रुग्णांना होडीतून स्थलांतर करण्याची पाळी पालिका आणि आपत्ती व्यवस्थापनावर येते. इमारत बांधकाम परवाने देताना नगर विकास, नगर रचना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरातील पूररेषा आणि त्या ठिकाणी बांधकामे होत असतील, तर थांबवणे गरजेचे आहे. या वर्षी ऐन पूर काळात स्थानिक नागरिकांना आणि प्रशासनाला पूर भागातील नागरिकांना सुविधा आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता महाडमधील पूररेषा आणि देण्यात येणारे बांधकाम परवाने याबाबत विचार होणे काळाची गरज बनली आहे. नागरिकांनी देखील घर घेताना पूर भागाचा विचार करूनच घर घेतले पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply