मोहोपाडा : प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसने जनता हतबल झाली असून राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. काही दिवस दवाखाने उघडे न ठेवता रसायनी परिसरातील काही डॉक्टरांकडून रुग्णांना ऑनलाइन, व्हिडीओ कॉलवर आजाराचे निदान केले जात होते. कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दवाखान्यातील डॉक्टरांना शासनाकडून कोणतीही सुरक्षितता न मिळाल्याने डॉक्टरांसमोर एक दिव्यच होवून बसले होते. शिवाय खासगी दवाखान्यात गर्दी होत असल्यामुळे व पुरेसी सुरक्षित साधने नसल्यामुळे डॉक्टरांनी ओपीडी बंद केली होती. यामुळे इतर आजार असणार्या सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होत होती.
शासनाच्या आदेशानुसार दवाखाने बंद ठेवू नये याबाबत स्थानिक आमदार महेश बालदी यांनी तहसीलदार खालापूर यांना पत्राव्दारे मोहोपाडा व परिसरातील दवाखाने चालू व्हावे, असे कळविले होते. त्याची दखल घेऊन तहसीलदार खालापूर यांनी रसायनी परिसरातील डॉक्टरांना दवाखाने चालू करण्यास विनंती केली. यावर डॉक्टरांनी समंजस्यपणा दाखवून आपले दवाखाने शनिवारी (दि. 28) सकाळपासूनच सुरू केले आहेत.
मोहोपाडा येथील डॉ. मनोज कुचेरिया, डॉ. युवराज म्हशीलकर व डॉ. चव्हाण यांनी आपापले दवाखाने उघडले आहेत गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायत वासांबे व सामाजिक कार्यकर्ते मदत करणार असल्याचे समजते. परिसरातील डॉक्टरांनी दवाखाने चालू केल्याबद्दल रसायनीकर आमदार महेश बालदी, शासन व परिसरातील डॉक्टरांचे आभार व्यक्त करीत आहे.