श्रावण महिना आला की गोविंदा आला रे आला या गाण्याने अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वांचा आवडता सण-उत्सव म्हणजेच गोपाळकाला.
गोपाळकाला हा श्रीकृष्ण जयंतीच्या दुसर्या दिवशी साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. या दिवशी ठीकठिकाणी दहीहंडी टांगली जाते आणि बालगोपाळांची गोविंदा मंडळे त्या ठिकाणी जाऊन मनोरे लावून दहीहंडी फोडतात आणि बक्षिसे मिळवतात. महाराष्ट्रात हा सण अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. तसा हा सण संपूर्ण भारतातही मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो, परंतु महाराष्ट्रातील त्याचे स्वरूप जरा भिन्न आहे.
कृष्णाष्टमीच्या दुसर्या दिवशी जो दहीहंडीचा सण साजरा केला जातो, त्याला आपण गोपाळकाला असे म्हणतो. श्रीकृष्ण गोकुळात मोठा होत असतो. गोकुळवासीयांचा मुख्य व्यवसाय म्हणजे गाईंचे पालन आणि दूधदुभते इत्यादी पदार्थ यांची विक्री करणे होय. त्या वेळची बाजारपेठ मथुरा होती. या ठिकाणी जाऊन गवळी आणि गवळणी दुधाचे तूप, लोणी असे पदार्थ विकत असत. त्यावरच त्यांचा चरितार्थ चालत असे.
भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे आठवे अवतार मानले जातात. वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात होतो. श्रावण वद्य अष्टमी, नक्षत्र रोहिणी, चंद्र वृषभ राशीत असताना श्रीकृष्णाचा जन्म होतो. श्रीकृष्णाच्या जन्माने सर्वत्र अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. कंसासारख्या दुष्टांचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झालेला असतो. गोकुळात श्रीकृष्ण लहानाचा मोठा होतो. नंदपत्नी यशोदा श्रीकृष्णाचे सर्व लाड पुरवतात. श्रीकृष्णाच्या सर्व बाललीला गोकुळामध्ये घडत असतात.
श्रीकृष्णाला वाटे की कंसाच्या मथुरेत दही, लोणी जाऊ नयेत. आपल्या गोकुळातील सवंगड्यांना हे खायला मिळावे. श्रीकृष्णाला ते धष्टपुष्ट व्हावेत असे वाटे. श्रीकृष्ण आणि त्याच्या सोबत्यांचे एक मंडळ होते.
थोडक्यात, ते एक गोविंदा मंडळच होते. त्यामुळे श्रीकृष्ण त्याच्या मित्रांसमवेत घरांमध्ये गुपचूपपणे शिरून तेथील शिंक्यावरचे दही, दुधाचे माठ काढून किंवा फोडून आपल्या सवंगड्यांना स्वतःच्या हाताने खायला देत असे. श्रीकृष्णालाही दही, दूध, लोणी हे पदार्थ फार आवडत.
श्रीकृष्ण आपल्या या सगळ्या सवंगड्यांबरोबर आपापल्या घरातील शिदोरी घेऊन वनात गाई-गुरे चारण्यासाठी जातो. दिवसभर त्या ठिकाणी हे बाळगोपाळ अतिशय आनंदाने खेळत असतात. दुपारची वेळ होते. सर्व जण भुकावलेले असतात. सर्व बाळगोपाळ गोलाकार जेवायला बसतात. सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणलेले असतात.
श्रीकृष्ण सांगतो की आता आपण हे सगळे पदार्थ एकत्र करून खाऊ. त्याचा काला करू. खूप छान होईल. सर्व गोपाळ ऐकतात आणि सगळ्या शिदोरीचा एकत्रित काला होतो. तो काला श्रीकृष्ण स्वतःच्या हाताने सर्वांना खायला देतो. हा काला सर्वांना खूप आवडतो. स्वर्गातून देव पाहत असतात. श्रीकृष्णाच्या हातचा काला खाण्याची इच्छा देवांना होते. सर्व देव यमुनेच्या पाण्यात माशांच्या रूपाने येतात.
काला खाल्ल्यानंतर गोपाळ यमुनेवर हात धुण्यासाठी येतील. तेव्हा त्यांचे उष्टे आपण खाऊ, अशी त्यांची कल्पना असते, परंतु श्रीकृष्ण हे जाणून असतात ते आपल्या सोबत्यांना आपले हात धुण्यासाठी यमुना नदीवर जाऊ देत नाहीत. त्यामुळे देव हिरमुसतात. त्यानंतर दररोज श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी काल्याचा आनंद घेतात.
गोपाळकाला उत्सवामागे श्रीकृष्णाचे आपल्या सगळ्यांचा शिंक्यावरचे दूध, दही चोरून खाणे आणि गाईमागे वनात गेल्यावर दुपारच्या वेळी गोपाळकाला करून खाणे ही कथा आहे. महाराष्ट्रात मुंबई-पुणे इतर सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये दहीहंडीचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा होतो. यानिमित्त दहीहंडी फोडण्याची स्पर्धा असते. खूप उंचावर दोरांचा वापर करून एका मडक्यात दहीकाला बनवून त्यावर एक नारळ ठेऊन बांधले जाते. सुंदर अशा फुलांच्या हारांनी दहीहंडी सजवलेली असते. गोविंदा मंडळे येतात. उंच-उंच मनोरे तयार करून दहीहंडी फोडतात आणि बक्षिसे मिळवतात.
-तुकाराम गायकर