माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील विळे-भागाड परिसरात आलेल्या पॉस्को कंपनीचा फायदा स्थानिकांना नव्हे; तर येथील मूठभर पुढार्यांना, त्यांच्या मुलांना तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (दि. 13) माणगाव येथे बोलताना केला. विळे-भागाड एमआयडीसी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांवर झालेल्या अन्यायाबाबत भागाड सरपंच प्रकाश जंगम, विळे वरचीवाडी सरपंच परशुराम कोदे, माणगाव तालुका अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उतेकर, एस. पी. लॉजीस्टिकचे प्रोप्रा. संतोष पोलेकर यांनी माणगाव पोलीस ठाण्याजवळ 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी सायंकाळी 6:30 वा. भेट देऊन स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी भाजप राहील, असे सांगितले. या वेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, प्रदेश सचिव रविभाऊ मुंढे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, ज्येष्ठ नेते नाना महाळे, सुरेंद्र साळी, महिला मोर्चाच्या प्राजक्ता शुक्ला, माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्त्वे, माजी तालुकाध्यक्ष यशोधरा गोडबोले, तालुका सरचिटणीस उमेश साटम, बाबूराव चव्हाण, संजय जाधव, राजू मुंढे आदींसह स्थानिक भूमिपुत्र व महिला उपस्थित होत्या. या ठिकाणी मार्गदर्शन करताना प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, पॉस्को कंपनी माणगाव तालुक्यात आल्यावर परिसराचा विकास होऊन स्थानिकांना नोकर्या मिळतील असे वाटले होते, पण या ठिकाणी विकास येथील मूठभर पुढार्यांचा व त्यांच्या मुलांचा तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचा होताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आता केवळ उपोषणावर चालणार नाही तर प्रसंगी पेटून उठावे लागेल. जशास तसे उत्तर द्यावे लागेल. पॉस्को कंपनीत गाड्या फोडणे, गैरवर्तणूक करणे असे प्रकार घडत असताना या लोकांना पोलीस प्रशासन पाठबळ देत असेल तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन होईल. हे आंदोलन पुढे जिल्हा व राज्यस्तरावर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पोलीस हे जनतेचे सेवक असून ते पुढार्यांचे नोकर नाहीत याचे भान पोलिसांनी ठेवायला हवे.पोलिसांना आमचे सहकार्य राहील, परंतु त्यांनी कोणाला पाठीशी घालू नये. यापुढे विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मी स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी नेतृत्व करायला येईन, असे सांगितले आहे. यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर विश्वास दाखवत उपोषणकर्त्यांनी दरेकर यांच्याच हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडले.