स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
कर्जत : बातमीदार
नेरळ बाजारपेठेतील माऊली मेडिकल स्टोअरला रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आग लागली. मात्र स्थानिकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. या आगीत दुकानातील औषधांचा साठा व अन्य वस्तू मिळून सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
नेरळ मुख्य बाजापेठेतील शिवरत्न जिवाजी महाले चौकात विवेक दहिवलीकर यांच्या मालकीचे माऊली मेडिकल स्टोअर आहे. या दुकानाला रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आग लागली. दुकानाच्या शेटरमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांची माहिती दहिवलीकर यांना फोनवरून देण्यात आली. मात्र दहिवलीकर यांना घटनास्थळी पोहचण्यास उशीर झाल्याने आगीच्या दाहकतेने दुकानातील औषधे व अन्य साहित्याचे नुकसान झाले. यात पाच लाख रुपये किमतीचा औषधांचा साठा व अन्य साहित्य मिळून सुमारे सहा लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
माऊली मेडिकल स्टोअरला लागून किराणा मालाचे दुकान तर वरच्या बाजूस बँक आहे. मात्र मेडिकल स्टोअरला आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.