Breaking News

रसायनी विद्युत वितरण कार्यालयाला नागरिकांचा घेराव

खालापूर : प्रतिनिधी

विद्युत पुरवठ्यामध्ये चाललेल्या सावळ्या गोंधळाबाबत रसायनी परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी महावितरण उपअभियंत्यांना निवेदन दिले. परिसरातील विविध समस्यांना रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. याकरिता रसायनी परिसरातील सर्वपक्षीय नेते व व्यापारी असोसिएशन मोहपाडा यांच्या शिष्टमंडळाने एमएसईबी कार्यालय उपअभियंता किशोर पाटील यांना शनिवारी (दि. 9) परिसरातील विविध समस्या सांगितल्या.

विद्युत पुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. रात्रीअपरात्री जर एखाद्या वेळेस वीजपुरवठा बंद झाला, तर दुसरा दिवस उजाडल्याशिवाय विद्युत पुरवठा चालू होत नाही. या कार्यालयात विद्युत कर्मचारी कमी असल्याचे उत्तर वारंवार अधिकार्‍यांकडून दिले जात आहे. पूर्वीपेक्षा कमी कामगार असल्याने वीज येण्यास विलंब लागत आहे. यासाठी विद्युत कर्मचारी भरावेत, तसेच कोरोनाच्या महामारीमुळे गोरगरीब नागरिकांना कोरोनाची परिस्थिती पाहता विद्युत बिल भरण्यासाठी टप्प्याची मुभा देण्यात यावी. नागरिकांचे कोणतेही कारण न ऐकता लगेचच विद्युत पुरवठा बंद करू नये. परिसरातील डीपीवर कव्हर असावे, जेणेकरून एखादा अपघात होऊ नये, अशा समस्या घेऊन उपअभियंता किशोर पाटील यांना सर्वपक्षीय नेते व व्यापारी असोसिएशनकडून शनिवारी कार्यालयावर घेराव घालण्यात आला.

लवकरात लवकर परिसरातील वीजवितरण कार्यालयात विद्युत कामगार भरती करून कामगार वाढविण्यात यावे. विद्युत बिल भरण्यासाठी टप्प्याटप्प्याने परवानगी देण्यात यावी. लगेच वीज खंडित करू नये, अशा समस्यांचे निराकरण मोहपाडा अधिकारी किशोर पाटील यांनी करावे अन्यथा सर्वपक्षीय मोर्चा कार्यालयावर काढण्यात येईल, असे सर्वपक्षीय नेत्यांनी या वेळी सांगितले. येत्या बुधवारी मुख्य अभियंता यांची भेट सर्वपक्षीय नेते व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी घेणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अमित शहा यांनी सांगितले.

या वेळी भाजपचे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, प्रवीण जांभळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच संदीप ठोंबरे, माजी उपसरपंच दत्ता शिंदे, काँग्रेसचे माजी सरपंच कृष्णा पारंगे, तात्यासाहेब वासकर, शिवसेनेचे माजी रायगड जिप सदस्य सुरेश म्हात्रे, विभागप्रमुख अजित सावंत, माजी सभापती रमेश पाटील, शेकापचे समीर म्हात्रे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, अमित शहा, सचिन माळकर, अमित मांडे आदींसह व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply