अलिबाग : प्रतिनिधी
कोरोना निर्बंधात राज्य सरकारने सुट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. मात्र मंदिरे अद्याप खुली झालेली नाहीत. राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपतर्फे सोमवारी (दि. 30) राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग येथेही श्री काशी विश्वेश्वर मंदिरासमोर घंटानाद व शंखनाद आंदोलन करण्यात आले.
भाजपचे अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष अॅड. अंकित बंगेरा यांच्या नेतृत्वाखाली मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. घंटा, टाळ वाजवत मंदिर हम खुलवायेंगे, धर्म को न्याय दिलायेंगे असा नारा या वेळी देण्यात आला. मंदिर बंद गरिबांचे, हाल ठाकरे सरकार मालामाल अशा शब्दात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले.
श्रीकृष्ण जयंती आणि श्रावणातील शेवटच्या सोमवारचा मुहूर्त साधत भाजपच्या अध्यात्मिक समन्य सेलतर्फे या आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.
राज्य सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करून ठेवली आहेत. त्यामुळे मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजिविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांना राज्य सरकार कुठलीही मदत देत नाही किंवा मंदिरेही उघडत नाही देशातील अन्य राज्यात मंदिरे सुरू आहेत. देव-देवतांना बंदिस्त करून लाखो गरीबांची उपासमार करणार्या सरकारला इशारा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे अंकित बंगेरा यांनी सांगितले.