Breaking News

विकासाची गरुडभरारी

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2021 मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपीमध्ये 20.1 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवण्यात आली आहे. हा आकडा 21.4 टक्क्यांच्या दराइतका असेल असे अनुमान रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले होते. त्याच्या जवळपासच हा आकडा आहे. याचा अर्थ एवढाच की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी यशस्वीरित्या झुुंज देत भारतीय अर्थव्यवस्थेेने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे आणि विकासाच्या दिशेने दौड मारली आहे.

सकारात्मक दृष्टिकोन घेऊन संकटांवर मात करत जिद्दीने वाटचाल केली की अंतिम ध्येय गाठता येतेच. याचा सुखद साक्षात्कार मंगळवारी सार्‍या देशाला झाला असेल. नोटाबंदीनंतर नाके मुरडणार्‍या विरोधीपक्षांना आणि काही मोजक्या तथाकथित अर्थतज्ज्ञांना मंगळवारी जाहीर झालेल्या भारताच्या विकासाच्या आकडेवारीने चांगलीच चपराक बसली असेल. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन 32.38 लाख कोटी रूपये असल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन 26.95 लाख कोटी रूपये इतके होते. गेल्या वर्षी कोरोनाचा पहिला तडाखा देशाला बसला होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली होती. अर्थात त्याला इलाज नव्हताच. कोरोना विषाणूचे नेमके स्वरुप तेव्हा अज्ञात होते. हा जीवघेणा विषाणू भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात हाहाकार उडवू शकतो इतपत अंदाज आला होता. कोरोना प्रतिबंधक लस आणि औषधे दृष्टिपथात देखील नव्हती. अशा परिस्थितीत अनेक देशांनी जे केले तेच भारताला देखील करावे लागले. तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळच्या टाळेबंदीनंतर देशातील व्यवहार धिम्या गतीने सुरू झाले. या काळात अर्थचक्राचे उलटे फिरणे अपरिहार्य होते. त्या काळात जीडीपीचा दर उणे 24.4 टक्क्यांपर्यंत तळाला पोहोचला होता. त्या तुलनेत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव मात्र अर्थव्यवस्थेवर कमी प्रमाणात झाला असे आकडेवारीवरून दिसते. त्यालाही काही स्वाभाविक कारणे आहेत. कोरोनाची दुसरी लाट भारतीय नागरिकांनी अंगावर घेतली तेव्हा कोरोना प्रतिबंधक लसींचे अमोघ अस्त्र जगाच्या हाती लागले होते. कोरोनाशी कसे लढायचे याची थोडीफार कल्पना नागरिकांना आली होती. परिणामी यंदाच्या एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर सुखदरित्या वाढताना दिसत आहे. रिझर्व्ह बँकेने संपूर्ण आर्थिक वर्षासाठी 9.5 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज तूर्त वर्तवला असल्याने भारताची अर्थव्यवस्था आता योग्य मार्गावर धावू लागली आहे असे निश्चित म्हणता येते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजीचे वारे भांडवली बाजारात देखील वाहू लागले होते. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी 52,950 वर असणारा सेन्सेक्स मंगळवारी, ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या दिवशी 57,552 अशा अत्युच्च पातळीवर स्थिरावला. महिनाभराच्या अवधीत ही चार हजार अंशांची निर्देशांकाची भरारी शेअर बाजारात दिसून आली हे देखील भारतीय अर्थव्यवस्था दृढ होत असल्याचेच लक्षण मानले जाते. अर्थात सणासुदीच्या दिवसात ही शुभ लक्षणे दिसू लागली असली तरी बेसावध राहणे इष्ट ठरणार नाही. कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर उभी आहे असे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. त्यामुळे सावधगिरीनेच पुढे जात राहिले पाहिजे.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply