ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी विशिष्ट क्रीडा व्यवस्था अस्तित्वात असावी लागते. अमेरिका, चीन, जपान, रशिया आणि युरोपीय देशांमध्ये खेळाडू तयार करण्याचे अक्षरशः कारखाने उभे राहिले आहेत. उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा, खेळाडूंचे पालनपोषण, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पोटापाण्याची सोय, मार्गदर्शकांची नियुक्ती आणि त्यांच्या कामगिरीवरील देखरेख हे सारे डोळ्यात तेल घालून पाहणारी व्यवस्था या देशांनी प्रयत्नपूर्वक उभी केली आहे. दुर्दैवाने भारतामध्ये क्रिकेट सोडून बाकी सारेच खेळ तसे दुर्लक्षित राहिले. गेल्या सात-आठ वर्षांमध्ये मात्र हे चित्र पालटताना दिसत आहे.
जपानमधील टोकियो येथे सुरू असलेल्या दिव्यांग खेळाडूंच्या पॅरालिम्पिक सोहळ्यात भारतीय खेळाडूंनी अक्षरश: पराक्रम गाजवला असून त्यामुळे देशभरात आनंदाचे भरते आले आहे. सोमवारच्या एकाच दिवशी भारतीय पॅरालिम्पिकपटूंनी दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एका ब्राँझ पदकाची जोरदार लयलूट केली. मंगळवारपर्यंत तर भारताच्या पदकसंख्येने ऐतिहासिक दुहेरी आकडा गाठला. सोमवारी नेमबाज अवनी लेखारा हिने नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले, तर भालाफेकीमध्ये सुमित एन्टिलने सुवर्ण पदकाची कमाई करत नीरज चोप्राचाच कित्ता गिरवला. भालाफेकीच्याच स्पर्धेत सुंदर सिंग गुर्जर याने कांस्य पदकाची कमाई केली, तर थाळीफेकीत योगेश कथुनिया याने रौप्य पदकाची कमाई केली. पॅरालिम्पिक क्रीडा सोहळ्यात एकाच वेळी इतकी पदके मिळवल्याची इतिहासात नोंद झाली. यामुळे सर्वच भारतीयांची मान अभिमानाने उंचावली असेल. कोरोना विषाणूच्या महासंकटामुळे सारेच जग केविलवाणे झाले होते. एका अदृश्य विषाणूपुढे संपूर्ण मानवजात हतबल ठरली होती. ही हतबलता टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशोदेशीच्या खेळाडूंनी अक्षरश: झुगारून दिली आणि दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मानवी मर्यादांचा कस यांच्या जोरावर या विश्वात माणूस हा प्राणी सर्वश्रेष्ठ का आहे याचे चोख उत्तर स्वत:लाच दिले. परिस्थितीशी सामना करत अथक सराव करून स्वत:ला घडविणार्या ऑलिम्पिकपटूंचा पदकापर्यंतचा प्रवास नेहमीच थक्क करणारा असतो. भारतासारख्या विशाल देशामध्ये आता आता कुठे एक प्रकारची क्रीडा व्यवस्था उभी राहू पाहात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळेच भारताचे खेळाडू ऑलिम्पिक पातळीवर पराक्रम गाजवताना दिसू लागले आहेत. गेल्या 70 वर्षांत शिस्तबद्ध अशी क्रीडा व्यवस्था या देशात अस्तित्वातच नव्हती. आता मात्र ऑलिम्पिक क्रीडा सोहळ्यामध्ये भारताची पाटी कोरीच राहणार ही अपेक्षा बदलू लागली आहे आणि काही अंशी तरी खेळाडूंची कामगिरी डोळ्यांत भरू लागली आहे. याच प्रक्रियेचे फलित आपण सारे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाहात आहोत. दिव्यांगांसाठीच्या पॅरालिम्पिक क्रीडा सोहळ्यात भारतीय खेळाडूंची देदिप्यमान कामगिरी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. शारीरिक मर्यादा असूनही त्यांनी नोंदवलेली अचाट कामगिरी पाहून धडधाकटांना देखील ओशाळल्यासारखे वाटावे. ज्या भारतीय पॅरालिम्पिकपटूंनी पदकांची कमाई केली, त्यांंना प्रसिद्धीमाध्यमांनी डोक्यावर घेतले. हे स्वाभाविकच आहे, परंतु खरे सांगायचे तर टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा सोहळ्यात सहभागी झालेला प्रत्येक खेळाडू हा भारतीय समाजासाठी खराखुरा हीरो आहे. एक आत्मचरित्र दुसर्या आत्मचरित्राचे प्रेरणास्थान ठरते असे एक इंग्रजी भाषेत सुभाषित आहे. त्याचेच ठळक उदाहरण म्हणूनच नेमबाज अवनी लेखारा हिच्याकडे बोट दाखवावे लागेल. प्रसिद्ध नेमबाज अभिनव बिंद्रा याचे चरित्र वाचून प्रेरित झालेल्या अवनीने सोमवारी इतिहास घडवून दाखवला. येणार्या अनेक पिढ्यांसाठी ती आणि तिच्यासारखे भारतीय पॅरालिम्पिकपटू आदर्श म्हणून नावाजले जातील.