कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी
नवी मुंबई ः प्रतिनिधी : नवी मुंबईतील वाशी सागरविहार येथे पादचारी पुलाचा काही भाग कोसळण्याची दुर्घटना घडली होती. सदर ठिकाणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दौरा करून पाहणी केली, तसेच सदर दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. सदर दुर्घटनेत दोन नागरिक जखमी झाले असून त्यांना वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका प्रथम संदर्भ रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती अतिशय गंभीर आहे. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्य वैद्यकीय अधीक्षक प्रशांत जवादे यांना तत्काळ रुग्णांना हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल येथे हलविण्यात येऊन त्यांच्यावर योग्य व मोफत उपचार करण्याचे आदेश देऊन ही सर्व जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगितले, तसेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे सदर पुलाचे बांधकाम व डागडुजी करणार्या कंत्राटदार, अभियंता आणि संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या वेळी आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले, नवी मुंबईसारख्या शहरात पादचारी पूल कोसळणे हे अतिशय दुर्दैवी आहे. पूल जुना असला तरी त्यावर निकृष्ट पद्धतीची डागडुजी करण्यात आली होती. यामुळे पालिकेतील अधिकारी, अभियंता, कंत्राटदारांचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. अशा दोशी अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. दुर्घटनेतील जखमींची विचारपूस करण्यास गेले असता त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याचे आढळले. त्यांना महापालिका अंतर्गत हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले असता जखमींकडे नवी मुंबईतील वास्तव्याची कागदपत्रे नसल्याने त्यांना तत्काळ 85 हजार रुपये भरण्यास सांगितले, परंतु महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याने त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची आहे. जखमींना तत्काळ हिरानंदानीमध्ये हलवून उपचार करण्याची मागणी करण्यात आली असून महापालिका आयुक्तांनीही सकारात्मकता दाखवून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतील, असे सांगितल्याचे आ. म्हात्रे यांनी स्पष्ट केले.