कळंबोली ः बातमीदार
कर्नाळा अभयारण्यात परिसरातील अपघातांमध्ये अनेक माकडे व इतर वन्यजीवांचे नाहक बळी जात आहेत. या निष्पाप जिवांचे संरक्षण व्हावे यासाठी स्वयंसेवी संस्था आणि वन्यजीवप्रेमींच्या वतीने रविवारी (दि. 5) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत मानवी साखळी तयार करून अभयारण्य वन विभागासह राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या मानवी साखळीला प्राणीमित्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीव हे प्रवासी, पर्यटकांकडून टाकण्यात येणार्या खाद्यपदार्थांमुळे अपघात होऊन जिवाला मुकत आहेत. या संदर्भात प्रशासनाने उपाययोजना केल्या असल्या तरी त्या अपुर्या पडत असून वन्यजीवांचे बळी वारंवार जात आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण कट्टा विलेपार्ले, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी (पनवेल), पंख फाऊंडेशन पेण या संस्था आणि इतर वन्यजीवप्रेमींनी मानवी साखळी तयार करून प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी वन परिक्षेत्र अधिकारी राठोड यांना निवेदन देऊन केली. या वेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आम्ही वन्यजीव प्राणीमित्र लिहिलेल्या टोप्या आणि विविध बॅनरने महामार्ग खुलून निघाला होता. वन्यजीवप्रेमींनी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी शक्य ते सहकार्य करण्याची हमी देण्यात आली आहे, मात्र शासन-प्रशासनाकडून पुढील एक महिन्यात उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी या वेळी दिला. या मानवी साखळीत कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे, सुजित कदम, जगन्नाथ गावडे, दया मांडवकर, विनेश सितापराव, बालग्राम प्रकल्प समन्वयक उदय गावंड, राजेश रसाळ, जितेंद्र उरणकर, जीविता पाटील, देवेंद्र केळुसकर, आत्माराम डिके, राहुल वर्तक, दिलीप पवार, मिलिंद पालेकर, दीपक राणे, प्रभाकर सांडम, अशोक जडीयार, मनीष माईन, बालग्राम मित्र जयेश शिंदे, शैलेश कोंडसकर, राजू पाटील, रणजीत पाटील, जगदिश डंगर, तेजस चव्हाण, सचिन पाटील, सिद्धेश चव्हाण, राजेश पाटील, सचिन गावंड यांच्यासह 173 प्राणीमित्र सहभागी झाले होते.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …