प्रवाशांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष
माणगाव : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या माणगाव बसस्थानकाची दयनीय अवस्था झाली आहे. बसस्थानकाच्या आवारात मोठमोठे खड्डे पडले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत चालक या स्थानकात बस घेऊन येतात, तसेच प्रवासीदेखील चिखलातून मार्ग काढीत बस स्थानक गाठतात, मात्र त्याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रवासी व एसटी चालकांत संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून तालुक्याचे मुख्यालय आहे. येथील बसस्थानक हे 30-40 वर्षांपूर्वी बांधलेले असून या बस स्थानकात म्हसळा, श्रीवर्धन, पुणे, मुंबई, महाड या ठिकाणी जाण्यासाठी दररोज हजारो प्रवासी येत असतात, मात्र या बसस्थानकाची सध्यस्थितीत दयनीय अवस्था झाली आहे. स्थानकातील स्लॅब एसटी प्रशासनाने तोडून टाकले असून प्रवासी भर पावसात उभे राहून एसटीची वाट पाहत असतात. स्थानकाच्या आवारात मोठमोठे खड्डे पडले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. स्थानकाला गळती लागल्याने पाण्याने भिजून प्रवाशांचे हाल होत आहेत. स्थानकात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे, मात्र एसटी प्रशासनाला त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. पालकमंत्र्यांनी माणगाव बसस्थानकाला भेट देऊन तेथील समस्या दूर कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.