Breaking News

अभियांत्रिकी क्षेत्रातील अमूल्य रत्न : सर विश्वेश्वरैय्या

‘15 सप्टेंबर’ हा दिवस संपूर्ण भारतभरात ‘अभियंता दिन’ म्हणजेच ‘इंजिनियर्स डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. या विशेष दिनी अभियांत्रिकी प्रगतीचा आढावा घेत असताना एक बाब विशेषत्वाने जाणवली की आपल्या अभियंत्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या पाठीवर सर्वत्र आपल्या कार्याद्वारे विशेष मोहर उमटवली आहे आणि तीदेखील सर्व क्षेत्रात. फार विरळा क्षेत्र असं असावं जेथे अभियांत्रिकी ज्ञान वापरले जात नाही आणि या कारणाने ‘अभियांत्रिकी दिन’ हा सर्वांनी साजरा करायला हवा, असं जाणवलं.

‘नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडियन एम्पायर’ म्हणून संबोधल्या जाणार्‍या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा 15 सप्टेंबर 1861 हा जन्मदिन! अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचे कार्य त्या काळी ‘अद्वितीय’ आणि अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून गणले गेले. त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा भारतात ‘इंजिनियर्स डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या अभियांत्रिकी कार्याच्या गौरवार्थ 1955मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला. आजदेखील त्यांच्या ‘पायोनियरिंग’ अशा परिवर्तनात्मक कार्यास संशोधनकार्यात विशेषत्वाने उल्लेखले जाते. त्यांच्या एकंदरीत कार्याची व्याप्ती बघता जाणवतं की एक रोल मॉडेल म्हणून त्यांचं व्यक्तिमत्त्व उलगडून जगासमोर मांडत राहायला हवं आणि एका प्रकारचा कॅलिडोस्कोपिक अनुभव घेत राहावा.

एक संस्कृत विद्वान, हिंदू ग्रंथांचे भाष्यकार आणि ‘आयुर्वेदिक वैद्य’ अशा विविध क्षेत्राद्वारे समाजाची सेवा करणार्‍या श्रीनिवास शास्त्री आणि त्यांना त्यांच्या कार्यात मोलाची साथ देणार्‍या वेंकटलक्षम्मा यांचे ‘सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या’ हे सुपुत्र! वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरवले आणि स्वबळावर अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगतीच्या वाटेवर ते चालत राहिले. सीओईपी म्हणजेच अर्थात कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, पुणे येथे त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि प्रत्येक ठिकाणी उच्च श्रेणी प्राप्त करत गेले.

विश्वेश्वरैया यांच्या संशोधनातून निर्माण झालेल्या खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणामध्ये लागू झालेली, पाण्याचा अपव्यय टाळणारी, स्वयंचलित शीर्षद्वाराची यंत्रणा वाखाणली गेली आणि सर्वदूर त्यांना ओळखले जाऊ लागले.

एक अभियंता म्हणून विश्वेश्वरैया यांची वाटचाल दमदार होती. त्यांच्या उत्कृष्ट अशा उल्लेखनीय कार्यशैलीने त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशिष्ट प्रभाव निर्माण केला. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर विश्वेश्वरैया यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. त्यानंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून आमंत्रित करण्यात आले. त्यांनी दक्षिण क्षेत्रात पाटबंधार्‍याची एक अतिशय क्लिष्ट योजना राबविली. विश्वेश्वरैया यांनी ‘सांडव्याची स्वयंचलित पूरनियंत्रण द्वार’ प्रणाली विकसित केली व त्याचे पेटेंट घेतले, जी यंत्रणा सन 1903 मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. या नावीन्यपूर्ण टेक्निकद्वारे धरणातील साठ्याची पूरपातळी पूर आल्यानंतरदेखील धरणास कोणताही धोका न होता उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती टिग्रा धरण, ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण, म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली, त्यानंतर अनेक मोठ्या आणि महत्त्वपूर्ण प्रकल्पात विश्वेश्वरैया यांच्या प्रणालीचा समावेश करण्यात आला. विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासून गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही विश्वेश्वरैया यांनी पुढाकार घेतला आणि या प्रकल्पातदेखील त्यांचं योगदान अग्रगण्य ठरलं.

सन 1908 मध्ये स्वेच्छा-निवृत्तीनंतर म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून विश्वेश्वरैया यांना नियुक्त केले गेले. कृष्णराज वोडेयार (चतुर्थ) या म्हैसूरच्या महाराजांचा त्यांनी विश्वास प्राप्त केला आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्विवाद महत्त्वपूर्ण असे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत विश्वेश्वरैया यांनी 1917 मध्ये बंगलोर येथील ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय’ स्थापित केले. आजही भारतातील एक प्रथम अभियांत्रिकी संस्था म्हणून ती ओळखली जाते. सर मो. विश्वेश्वरैया यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासून ते निर्मितीपर्यंत, संपूर्ण प्रकल्प हाताळला. या धरणाचे निर्मितीकार्यदेखील अत्यंत उल्लेखनीय असे ठरले आणि त्याद्वारे आशियातील सर्वात मोठे सरोवर तेथे निर्माण झाले, ज्यामुळे सर मो. विश्वेश्वरैया यांना ‘म्हैसूर राज्याचे पिता’ म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हैसूर राज्यातील त्यांच्या कार्यकालादरम्यान त्यांनी म्हैसूर सोप फॅक्टरी, कीटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेंद्र पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, बंगलोर अ‍ॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बँक ऑफ मैसूर, सेंचुरी क्लब, मैसूर चेंबर ऑफ कॉमर्स असे अनेक औद्योगिक प्रकल्प सुरू केले. तीरुमला-तीरुपती रस्ते बांधणीतदेखील विश्वेश्वरैया यांचे योगदान होते. त्यांनी सदैव औद्योजक क्षेत्रातील खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. प्रामाणिकता, वेळेचे नियोजन, कार्याप्रती पूर्ण समर्पण यासाठी विश्वेश्वरैया यांचे उदाहरण दिले जाते.

सुमारे सहा वर्षे मैसूर संस्थानचे ‘दिवाण’ या नात्याने उद्योग, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात विश्वेश्वरैया यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यांनी सर्वप्रथम मैसूर आर्थिक परिषदेला स्थायी रूप देऊन अनेक विकासकार्ये मार्गी लावली. मैसूर बँक, मैसूर विद्यापीठ, प्रायमरी एज्युकेशन, कृषी विद्यापीठ, वृंदावन गार्डन, कन्नड साहित्य अ‍ॅकेडमी, आर्थिक आणि कार्यक्षमता लेखापरीक्षण इत्यादी मौलिक कार्य विश्वेश्वरैया यांच्या हातून घडलं.

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचे कावेरी प्रकल्पाचे निर्मितीकार्य जवळून बघण्याचा योग आला, तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे भेट दिली असताना. कूर्ग, मैसूर या ट्रिपमध्येे वृंदावन गार्डन, मैसूर पॅलेस, धरण आदी बघताना हे अनुभवले की या महान अभियंत्यांवर भाष्य करण्यास लहान, मोठे, सर्वजण उत्सुक होते.

सर विश्वेश्वरैय्या यांना अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले. त्यांना मिळालेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान त्यांच्या कीर्तीत अधिकच भर पाडून गेला. म्हैसूर येथे कार्यरत असताना त्यांना जनतेसाठी केलेल्या कामांमुळे ‘नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडियन एम्पायर’ या सन्मानाने गौरविले गेले.

सर मो. विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व, तर ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या बंगलोर शाखेने फेलोशिप प्रदान करून त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. सन 1923च्या इंडियन सायन्स काँग्रेसचे ते अध्यक्ष होते.

-डॉ. शुभांगी रथकंठीवार

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply