Breaking News

मिठाई दुकानदारांना बाप्पा पावला

गणेशोत्सवात मिठाई खरेदी वाढली

खोपोली : प्रतिनिधी

यंदाचा गणेशोत्सव जरी निर्बंधात साजरा होत असला, तरी कोरोनाच्या ओसरलेल्या दुसर्‍या लाटेमुळे खालापूर तालुक्यात बाप्पांचे आगमन उत्साहात झाले असून, या वेळी मिठाई विक्री चांगली होत असल्याने मिठाई दुकानदारांना बाप्पा पावला आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव मोठा असल्याने नियमात शिथिलता देण्यात आली नव्हती. सणासुदीलादेखील दुकाने बंद ठेवण्याची पाळी व्यावसायिकांवर आली होती. त्याचा मोठा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागला होता. यंदादेखील दुसर्‍या लाटेमुळे तीच परिस्थिती ओढवल्यास व्यवसाय बंद करण्याची पाळी येईल, अशी भीती अनेक दुकानदारांनी बोलून दाखवली होती. सुदैवाने तालुक्यात कोरोना संसर्गाला लागलेल्या ब्रेकमुळे या वेळी दुकानाच्या वेळा वाढवण्यात आल्या.

खालापूर तालुक्यात सुमारे साडेपाचशेच्या आसपास मिठाई विक्रीची दुकाने असून, सणासुदीला होणारी मोठी उलाढाल यावर अनेकांचे व्यवसाय अवलंबून आहेत. गणपतीसाठी तयार करण्यात येणारी विविध प्रकारची मिठाई, मोदकाचे प्रकार याला दरवर्षी मोठी मागणी असते. यंदा बाप्पांच्या आवडीचे विविध प्रकारचे मोदक, तसेच इतर मिठाई खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे मिठाई विक्रेत्यांमध्ये यंदा बाप्पा पावल्याची भावना दिसत आहे. कंदी मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक, खवा मोदक असे विविध प्रकारचे तीनशे रुपये किलोपासून साडेनऊशे रुपये किलो दराच्या मोदकांची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याने मिठाई व्यवसाय यंदा तेजीत आला आहे.

सणासुदीला मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी होते. त्यामुळे यंदा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी इच्छा होती. ती बाप्पांनी पूर्ण केली. व्यवसायात गेल्या वर्षी मंदी असली, तरी कारागिरांचा पगार आणि इतर खर्च याचा ताळमेळ बसवताना नाकी नऊ आले होते. या वर्षी मात्र मिठाई विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे.

-राजू भोपतराव, मिठाई विक्रेता, चौक, ता. खालापूर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply