जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत महाड तालुक्यातील शासकीय मालमत्तेबरोबरच गावागावांतील नळपाणी पुरवठा योजनादेखील बाधित झाल्या. अनेक गावांच्या पाणी योजना पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, तर विहिरी कोसळण्याच्या घटनादेखील घडल्या. या पाणीपुरवठा योजना, पाण्याचे उद्भव, स्त्रोत आदीच्या दुरुस्तीसाठी स्थानिक प्रशासनाला निधीची गरज आहे. महाड तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन महापूर आला. यामध्ये रस्ते, शासकीय इमारती, पूल आदी शासकीय मालमत्तेसह गावागावातील नळपाणीपुरवठा योजनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांश पाणीपुरवठा योजना या नदीकिनारी असल्याने पुराच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात पाईपलाईन उखडून गेली तर काही ठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील सुमारे 72 नळ पाणीपुरवठा योजना तर 14 विहिरी, आणि दोन तलावांचे नुकसान झाल्याचा अहवाल येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वरिष्ठ कार्यालयाला सादर केला आहे. यामध्ये पारमाची, बारसगाव, वरंध, गोठे बुद्रुक, मोहोत, राजेवाडी, भावे, कांबळे तर्फे बिरवाडी, कुंभे शिवथर, कोथुर्डे, नागाव, वाळसुरे, चापगाव, पडवी पठार, आकले, मोहोप्रे, किंजलोळी, काळीज, बिरवाडी, कोंडीवते यांसह अन्य गावातील नळ पाणीपुरवठा योजना, तर रानवडी, वाळण येथील पंपगृह तर कोल आणि नागावमधील विहिरींचा समावेश आहे. महाडसह परिसरात जवळपास 4.5 हजार मिली पाऊस पडतो. काही दशकांपूर्वी हे मापांक 2.5 ते 3 हजार मिमी एवढे होते, मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे बिघडत चालेल्या निसर्गाचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर, दरडी कोसळण्यासारख्या घटना वाढू लागल्या आहेत. 4.5 हजार मिमी एवढा प्रचंड पाऊस पडूनही महाड तालुक्यातील बहुतांश गावांना आजही एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या गावांना पंचायत समितीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या टँकर्ससाठी एवढा भरमसाठ खर्च होतो की त्यातून टंचाईग्रस्त गावांना बिसलरीचे पाणी देता येईल. आजही महाड तालुक्यामधील अनेक गावांतील महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली आलेला नाही. तत्कालिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाडमधील गांधारी नदी पुनर्जीवित प्रकल्प अंतर्गत ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधल्यामुळे रायगड विभागातली पाणीटंचाई काही काळासाठी कमी झाली होती, मात्र ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी हे बंधारे निरुपयोगी ठरले आहेत. अनेक गावांतील पाणीयोजना दुरुस्तीअभावी किंवा लाईट बिल न भरल्याने बंद स्थितीत आहेत. एवढे थोडे म्हणून की काय निसर्ग चक्रीवादळ आणि 22 जुलैच्या महाप्रलयात तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे. महाप्रलयात या योजना बाधित झाल्याने नागरिक सध्या पिण्याच्या पाण्यासाठी अन्य स्त्रोतांचा वापर करीत आहेत. शिवाय पूरग्रस्तांना आलेल्या मदतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा साठा असल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवली नाही. पावसाळ्यानंतर मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवणार आहे. टंचाई काळाच्या आतच या पाणीपुरवठा योजना दुरुस्त होणे गरजेचे आहे. त्याबाबत महाड पाणीपुरवठा विभागाकडून प्रस्ताव सादर केला असून या बाधित योजनांना आता निधीची प्रतीक्षा आहे. या संपूर्ण दुरुस्तीसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला तब्बल पाच कोटी 47 लाख रुपयांची गरज असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
महाडमध्ये आलेल्या महापुरात महाड तालुक्यातील अनेक गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना, विहिरी आणि तलावांचे नुकसान झाले आहे. त्यामधील काही गावात पर्यायी व्यवस्था करून पाणीपुरवठा सुरू आहे. या योजनांच्या दुरुस्तीसाठी लागणार्या निधीची पूर्तता झाल्यानंतर तत्काळ कामे हातात घेतली जातील.
-श्री. फुलपगार, शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग महाड