कोरोनावर भारताने मात केली आहे की नाही, हे नजीकचा भविष्यकाळच ठरविणार असला तरी भारतीयांनी त्याला स्वीकारून आपले व्यवहार सुरू केले आहेत, याची प्रचीती बाराशे किलोमीटरच्या प्रवासात आली. हजारो नागरिक आणि श्रमिक भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आपला वाटा उचलताना दिसत आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे, हे भारतीय शेअर बाजार ज्या आकड्यांच्या भाषेत सांगतो आहे, त्याची उभारणी अशा प्रचंड कामांनी होताना दिसते आहे, हे चित्र निश्चितच आशादायी आहे.
भारतीय अर्थव्यवस्था इतक्या वेगाने पूर्ववत होण्याच्या दिशेने जाताना का दिसते आहे, याची एक झलक नुकत्याच केलेल्या गुजरातच्या भेटीत पाहायला मिळाली. पुणे ते पाटन (मार्गे दमण, सुरत, केवडिया, वडोदरा, पावागढ, चंपानेर, लोथल) या सुमारे 1200 किलोमीटर प्रवासामध्ये मानवी जीवनाने पुन्हा कसा वेग घेतला आहे हे तर दिसलेच, पण विकसनशील असे बिरूद लावलेल्या आपल्या देशात किती प्रचंड कामे चालू आहेत, याची प्रचिती आली. कोरोना पेशंटची संख्या वाढते की कमी होते आहे, हा सध्या चर्चेचा एकच विषय असताना कोरोनाचे अस्तित्वच नाही, असे भाग या प्रवासात पाहायला मिळाले. पुण्यात परतलो त्यानंतर दोनच दिवसांत शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने 60 हजारचा महत्त्वाचा टप्पा पार केला, हा सध्याच्या काळात एक चमत्कारच मानला जात असताना या प्रवासात जे पाहायला मिळाले, त्यामुळे त्या मागील काही कारणे कळण्यास मदत झाली. आपला देश किती मोठा आहे आणि त्यामुळे त्याचे आकलन किती अवघड आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
कालीमाता आणि गिफ्टसिटी
कोरोना संकटात सर्वाधिक फटका बसला तो पर्यटन उद्योगाला. कोरोनाच्या भीतीने अनेक नागरिक प्रवास टाळत आहेत, त्यामुळे हॉटेल उद्योगाला ग्राहकांची प्रतीक्षा आहे. मात्र काही नागरिक बाहेर पडले असल्याने पर्यटन स्थळांना गर्दी असल्याचे चित्र या काळात पाहायला मिळाले. विशेषतः मंदिरे बंद आहेत आणि ती सुरू झाली पाहिजेत, अशी चर्चा सुरू असताना प्रत्यक्षात भाविकांनी ती सुरू केल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे त्याविषयी कोणाचीच तक्रार नाही आणि 30 टक्के नागरिक मास्क वापरतात, हे दृश्य सोडले तर कोरोनाचे अस्तित्वही अशा ठिकाणी पाहायला मिळत नाही. नाही म्हणायला, त्या त्या ठिकाणी मास्क बंधनकारक असल्याचे आणि परस्परांमध्ये अंतर राखण्याचे बोर्ड दिसतात खरे, पण त्याला आता सरकारी सूचना फलकांचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे ते वाचायचे आणि विसरून जायचे, असा त्याचा अर्थ बहुतेकांनी घेतलेला दिसला. गेली दीड वर्षे घरात कोंडल्याने कंटाळलेल्या नागरिकांनी अखेर परमेश्वरावर विश्वास ठेवून देवदर्शन करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसले. त्यामुळे पावागढच्या महाकालीच्या दर्शनासाठी गर्दी लोटली आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांना तब्बल 800 मीटर चढून जाण्याचे बळ आले. यासाठी काही जण विजेरी पाळण्याची मदत घेतात. महामारीवर मात करण्यासाठी अखेर विज्ञानाचाच आधार घ्यावा लागणार असला तरी गेल्या दीड वर्षांत त्यावरून जो संभ्रम निर्माण झाला आहे, त्याला कालीमातेच्या भक्तांनी पूर्णविराम दिल्याचे पाहायला मिळाले. अशा ठिकाणचे अर्थव्यवहार असंघटीत अर्थव्यवस्थेमध्ये मोडत असल्याने त्याचे आकडे संघटीत अर्थव्यवस्थेत दिसत नसले, तरी त्या संघटीत अर्थव्यवस्थेला या भाविकांचाच आधार आहे, हे विसरता येत नाही. भावी शहरे कशी असावीत, याचा वस्तुपाठ घालून देणारे अहमदाबादजवळचे सुनियोजित गांधीनगर आणि त्याच्याच शेजारी उभी राहात असलेल्या गिफ्ट सिटीतील टॉवर, सुरत आणि अहमदाबादेत कोठेही फिरले की सर्वत्र मेट्रोची चालू असलेली कामे पाहिली की आपल्या देशात होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रचंड उभारणीची कल्पना येते.
भारतातही झाले असे पर्यटनस्थळ
सध्याच्या काळात पर्यटनाला महत्त्व का आहे, हे समजून घेतले पाहिजे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार पर्यटन उद्योग हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जागतिक जीडीपीचा तब्बल 10 टक्के वाटा या उद्योगाचा असून त्याने जगात 32 कोटी नागरिकांना रोजगार पुरविला आहे. याचा अर्थ कोरोनाच्या काळात तो बंद होता म्हणजे किती रोजगारहानी झाली असेल, याची कल्पना येते, पण भारताला हे आकडे पूर्णपणे लागू नाहीत. कारण भारतातील पर्यटन हे बहुतांशी धार्मिक कारणांनी होते आणि त्याची मोजदाद करण्याचे शास्त्र अजून विकसित झालेले नाही. अर्थात, केवडिया येथे उभारण्यात आलेला सरदार पटेल यांचा भव्य पुतळा लाखो नागरिकांना आकर्षित करतो आहे आणि संघटीत अर्थव्यवस्थेच्या सर्व निकषांना ते ठिकाण पूर्ण न्याय देते आहे. तेथे रेल्वेने येण्याची सुविधा आहे, मोठमोठी हॉटेल्स आहेत, उत्तम रस्ते आहेत. मोठमोठ्या बागा आहेत. शिवाय नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरण तर आहेच. पर्यटकांना जे जे लागते, ते सर्व त्या ठिकाणी पहायला मिळते. कोरोनाने जी मुभा दिली, तिचा लाभ घेऊन हजारो पर्यटक तेथे दररोज दाखल होताना दिसले. त्यानिमित्ताने रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी, हॉटेल्स, पेट्रोल पंपांची अर्थव्यवस्था पुढे सरकताना दिसली. कोरोनाच्या काळातही तेथे दिवसाला 15 हजार पर्यटक भेट देत असून हा आकडा एक लाख झाला, तरी पायाभूत सुविधा कमी पडणार नाहीत, अशी व्यवस्था तेथे करून ठेवण्यात आली आहे. युरोप अमेरिकेत पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी काही पर्यटनस्थळे खास निर्माण केली आहेत. अशा ठिकाणी जगातील पर्यटक भेट देतात आणि त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात. अशा पर्यटकांमध्ये भारतीय पर्यटकांचा भरणा अधिक आहे. अर्थव्यवस्थेला बळ देणारी अशी नवी पर्यटनस्थळे आपल्याही देशात असली पाहिजेत, त्या दृष्टीने जगातील सर्वात उंच असलेला (182 मीटर) सरदार पटेलांचा भव्य पुतळा हे ठिकाण त्या सर्व निकषांना पूर्ण करते, असा हा परिसर पाहून निश्चितच वाटते.
रेल्वेचा कायापालट होतोय
सुमारे बाराशे किलोमीटरचा हा प्रवास प्रामुख्याने रेल्वेने केला, त्यातून रेल्वेमध्ये झालेल्या सुधारणांची प्रचिती येते. एकतर ठरलेल्या मिनिटांना रेल्वे निघते आणि पोचते असा सुखद अनुभव आला. स्टेशनवर कोठेही पूर्वीसारखी घाण आणि दुर्गंधीचा लवलेश नाही, त्यामुळे स्टेशनवरील वेळ चांगला जातो. मोठ्या स्टेशनवर असलेल्या रिटायरिंग रूम्स चांगल्या आहेत. तेजससारख्या गाड्या विमान प्रवासाची आठवण करून देतात. सार्वजनिक वाहतुकीवर विसंबून प्रवास केला जाऊ शकतो, हे यानिमित्ताने लक्षात येते. रेल्वे पूर्ण क्षमतेने अजून चालू झाली नसली, तरी काही गाड्या 70 ते 80 टक्के भरलेल्या होत्या. ते सर्वच जण सदासर्वकाळ मास्क वापरत नव्हते. याचा अर्थ पुढील काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट तीव्र स्वरूपाची न आल्यास आपण कोरोनावर मात केली, असा आशावाद या प्रवासातून मिळतो. मुंबई-अहमदाबाद या पटरीच्या शेजारी चालू असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामांची झलक पाहायला मिळते. रेल्वे जात असताना फाटक बंद असल्याने होणारी अडचण कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी पुलांची कामे सुरू असलेली दिसतात. पूर्वीच्या राखाडी रंगाच्या मळकट मालगाड्या आता कमी दिसतात. ती जागा आता रंगीबेरंगी, अनेकदा डबल डेकर मालगाड्यांनी घेतलेली पाहायला मिळते. इतक्या मालाची वाहतूक होते आहे, याचा अर्थ तेवढे व्यवहार होत आहेत तर!
कोरोनावर भारताने मात केली आहे की नाही, हे नजीकचा भविष्यकाळच ठरविणार असला तरी भारतीयांनी त्याला स्वीकारून आपले व्यवहार सुरू केले आहेत, याची प्रचिती या प्रवासात आली. हजारो नागरिक आणि श्रमिक भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आपला वाटा उचलताना दिसत आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे, हे भारतीय शेअर बाजार ज्या आकड्यांच्या भाषेत सांगतो आहे, त्याची उभारणी अशा प्रचंड कामांनी होताना दिसते आहे, हे चित्र निश्चितच आशादायी आहे.
-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com