Breaking News

वाढता वाढता वाढे-100वरून 60 हजार आणि केवळ 42 वर्षांत!

शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात खरोखरच साठी गाठली. अशा या बाजाराने 1979 पासून आतापर्यंत 60 हजार टक्के (100-60100) म्हणजे गेली 42 वर्षे द.सा.द.शे. 16 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे! या वर्षात जगात सर्वाधिक परतावा देणार्‍या भारतीय शेअर बाजाराच्या ‘बुल-रन’चा हा आढावा.

ऑक्टोबर 1998 मध्ये जेव्हा मी शेअर बाजारात प्रवेश केला तेव्हा बैल व भालू (अस्वल) यांचे सांकेतिक चिन्ह शेअरबाजारासाठी संबोधलेले माझ्या लक्षात आले आणि या गोष्टींशी अनभिज्ञ असल्याने मी याबद्दल जाणून घेतले. जसा बैल पळत येऊन धडका मारतो तशी शेअर बाजारातील तेजी असते, त्यात बाजाराच्या प्रवाहाच्या उलट जाणार्‍यांची खैर नसते. तर ज्याप्रमाणं अस्वल (डोंगरावरून) खाली उतरताना स्वतःला घरंगळत झोकून देते आणि अगदी थोड्याच अवधीत खूप खाली जाऊन पोहोचते मग त्यामध्ये कोण आल्यास त्याला अस्वल दाद देत नाही कारण त्याचा वेगच तसा असतो, तशाच प्रकारे बाजार अगदी कमी अवधीत खूप कोसळतो यालाच बेअररन म्हटलं जातं. तर सध्या आपण बुल-रन

अनुभवत आहोत. गेल्याच आठवड्यात उल्लेख केल्याप्रमाणं सेन्सेक्स या आठवड्यात साठी पार करून सिनियर सिटीझन झालाय, तर निफ्टी 50 आता 18 (हजारच्या)च्या उंबरठ्यावर येऊन ऍडल्ट होऊ पाहतेय.

आता बोटे मोडून उपयोग नाही

मागील वर्षी आलेल्या महामारीमुळं जगातील सर्वच बाजार कोसळले होते आणि आपला बाजार देखील यास अपवाद नव्हता. मागील वर्षी मार्च अखेरीस बाजारानं त्याआधीच्या 4 वर्षांतील तळ गाठला होता. मार्च 2016 मध्ये सेन्सेक्सनं 23000 व निफ्टीनं 7000 ची पातळी बघितली होती आणि मागील वर्षी निर्देशांक हे अनुक्रमे 25 व साडेसात हजारांच्या घरात येऊन गेले. त्यानंतर मात्र बाजारानं मागं म्हणून कांही पाहिलेलं नाही. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 60100 तर निफ्टी 17900 च्या आसपास आहेत. म्हणजेच गेल्या दीडच वर्षांत सेन्सेक्सनं 134 % तर निफ्टीनं 138% परतावा दिलेला दिसून येतो. बाजारातील अनेक विश्लेषक, सो कॉल्ड युट्युबर्स तज्ज्ञ आणि अनेक दिग्गज मंडळी अजूनही या तेजीबद्दल नाराजी व्यक्त करताना आढळतात आणि मग बाजाराच्या नावानं बोटं मोडताना दिसतात. कारण बाजारानं सुमारे 40 टक्क्यांची भलीमोठी प्राईस करेक्शन स्वीकारल्यानंतर केवळ कांही महिन्यांतच नवीन उच्चांक गाठले होते आणि त्यामुळं या लोकांची तोंडात गेलेली बोटं अजूनपर्यंत बाहेर येऊ शकलेली नाहीत. बाजार हा नेहमी पुढील कांही वर्षांच्या गोष्टी व संभाव्य घडामोडी विचारात घेऊन मार्गक्रमण करत असतो त्यामुळं बाजाराला खोटं ठरवण्याच्या नादात आपण मात्र आपलं नुकसान करून घेत नाहीय ना, हे तपासणं जास्त महत्वाचं ठरतं.

आज बाजारापासून लांब राहणारे लोक एकतर या वर्षी आलेले गुंतवणूकदार आहेत अन्यथा इकडचे तिकडचे ऐकून जाणकार लोकबाजारात किंमत सुधार होण्याची (प्राईस करेक्शन) वाट पहात काठावरच बसून आहेत. वास्तविक पाहता, बाजारातील करेक्शन ही त्या विशिष्ट काळासाठी इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापासून दूर ठेवत असते, परंतु तीच खरी संधी असते. ज्याप्रमाणं, प्रत्येक सूर्यास्त नवीन सूर्योदयाचा मार्ग मोकळा करत असतो, त्याचप्रमाणं शेअर बाजारातही प्रचंड घसरण झाल्यानंतर वाढ होत असते.

बुलरन-तेजी म्हणजे काय?

बुल मार्केट या शब्दाचा अर्थ असा आहे की जेंव्हा शेअरच्या अथवा निर्देशांकाच्या भावपातळ्या सलग उत्क्रमण करत राहतात म्हणजेच अपेक्षित दरापेक्षा वेगानं हे मार्गक्रमण असतं, यालाच अफाट तेजी अथवा बुलमार्केट म्हणतात.

तेजीच्या बाजारात, गुंतवणूकदारांच्या भावना सकारात्मक असतात, लोक कंपन्यांबद्दल एकूणच बाजाराबद्दल खूप आशावादी असतात आणि त्यांना सुरक्षित  पैशांचा विचार करून त्यांचे पैसे इक्विटीमध्ये ठेवणं आवडत असतं. मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांना या आशावादाचा जास्तीत जास्त फायदा होताना आढळतो. कंपन्या वाढीव दरानं प्रगति करताना आढळतात आणि या ट्रेंडला अनुसरून नवीन कंपन्या स्टॉक एक्सचेंजमध्ये स्वतःची नोंदणी करण्यासाठी रांग लावतात. या कालावधीत, राष्ट्राची अर्थव्यवस्था देखील सुधारते, जी मोठ्या प्रमाणात थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करते.       

1990-92 : मदर ऑफ ऑल बुल-रन

25 जुलै 1990 रोजी पहिली उल्लेखनीय बुलरन सुरू झाली, जेंव्हा सेन्सेक्सनं पहिल्यांदा चार अंकी आकडा ओलांडला. ही लाट उत्कृष्ट कॉर्पोरेट रिझल्ट्स  आणि चांगल्या मान्सूनमुळे झाली. 1991 मध्ये, जेंव्हा देश आर्थिक संकटातून जात होता, तेंव्हा आर्थिक सुधारणांचं वारं वाहू लागलं होतं तेंव्हाच बाजारानं पुढील गोष्टींचा आढावा घेऊन तेजी नोंदवली. जानेवारी 1991 मध्ये 1027 पातळीवरील सेन्सेक्स एप्रिल 1992 मध्ये 4500 च्या पातळीवर गेला; फक्त 14महिन्यांत साडेचारपट परतावा. याचा अर्थ गुंतवणूक 4.5 पटीनं वाढली, 1 लाख रुपयांची गुंतवणूक 14 महिन्यांत साडे चारलाख रुपये झाली असती. म्हणूनच या तेजीस अजूनपर्यंत मदर ऑफ ऑल बुल-रन असं संबोधलं जातं.

उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण अशा गोष्टी साध्य करत तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी मोठ्या प्रमाणात भांडवल उभं करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था विदेशी गुंतवणूकदारांसाठी खुली केली. तेजीचे असे काही कालखंड असे – जानेवारी 1992 – सेन्सेक्स 2000.

बाजाराशी सख्य सांगणारा देशाचा ऐतिहासिक ठरलेला अर्थसंकल्प – फेब्रुवारी 1992 – सेन्सेक्स 3200.

उदार आयात-निर्यात धोरण – मार्च 1992 – सेन्सेक्स 4000+या तेजीतच हर्षद मेहता स्कॅम नावाचं गालबोट लागलं.केवळ तीनच महिन्यांत एससीसीच्या शेअरचा भाव 200 रुपयांवरून 9000 रुपये झालाहोता.आणि हा (अवाजवी) तेजीचा फुगा फुटला आणि बाजार पुढील चारच महिन्यांत 50 टक्के कोसळला. त्यानंतर बाजारानं सुमारे त्यापुढील पांच वर्षं मरगळ अनुभवली. पुन्हा नवीन उच्चांक नोंदवण्यासाठी 1997 साल उजाडलं. त्यानंतर पोखरण चाचणीमुळं ऑक्टोबर 1998 मध्ये सेन्सेक्स पुन्हा 3000 अंशांच्या खाली आला. 13 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या स्थापनेमुळं पुढील एका वर्षात सेन्सेक्सनं पुन्हा 5000 चा आकडा पार केला. 

2004 – 2008 : आर्थिक संकट आणि घोटाळे

या काळात, भारत वेगानं वाढणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक होता ज्यानं वार्षिक 8-9% वाढ नोंदवली. दरम्यान इन्फ्रा, फार्मा आणि एफएमसीजी कंपन्यांच्या समभागात वाढ झाली. जानेवारी 2004 मध्ये 6250 असणारा सेन्सेक्स जानेवारी 2008 मध्ये 21200 च्या वर गेला. 4 वर्षात बाजारानं 236% परतावा दिला. प्रत्येक अल्पायुषी आनंदाप्रमाणेच, या बुलरनचा शेवट वाईटात झाला. 2008 मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं. नंतर टूजी, कोल गेट, व्यापम घोटाळा असे इतर अनेक घोटाळे भारतात उघडकीस आले. दरम्यान, ग्रीस डिफॉल्टच्या मार्गावर होता ज्यामुळं विदेशी गुंतवणूकदार घाबरले. या घटनांमुळे सेन्सेक्स ऑक्टोबर 2008 मध्ये 7700 च्या देखील खाली आला. नंतर 2009 मधील केंद्रीय निवडणूकीत युपीए सरकारच आल्यानं बाजारास शाश्वती मिळाली आणि सेन्सेक्स पुन्हा 14900 झाला (सहा महिन्यांतच दुप्पट). नोव्हेंबर 2010 रोजी सेन्सेक्सनं प्रचंड उडीसह 21000 चा आकडा पार केला. या वाढीमुळे बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील शेअरच्या किमती वाढल्या. ही तेजी पुढील तीन वर्षं बरकरार राहिली. नंतर, स्थिर अशा मोदी सरकारच्या आशावादावर हीच तेजी जोपासली गेली आणि त्यातून रिझर्व्ह बँकेच्या रेट-कट धोरणामुळं कर्ज स्वस्त होण्यास मदत होऊन अर्थव्यवस्थेस चालना मिळणार याबाबत समीकरणं बांधून मार्च 2015 रोजी सेन्सेक्सनं 30 हजारांचा टप्पा पार केला.  

2016-2020 म्युच्युअल फंड सही हैं

2015पासून भारतीय किरकोळ गुंतवणूकदार म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपली बचत बाजारात गुंतवू लागले आणि बघता बघता हा ओघ विक्रमी बनला. यामुळं 2017 मध्ये बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 60% वाढला तर बीएसई मिडकॅप निर्देशांक पुढील वर्षी 48 टक्क्यांनी वाढला होता. 2014 पासून, केंद्रात स्थिर सरकार असल्यानं, व्यवसायवृद्धी आशावाद देखील मोठ्या प्रमाणात सुधारला. यामुळं पायाभूत प्रकल्पांना चालना मिळाली आणि या दरम्यान अनेक विलीनीकरणं झाली. कर्जाची सहज उपलब्धी होऊ लागली, ईझ ऑफ डुईंग बिझनेसची घोषणा झाली आणि अशाप्रकारे अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आणि या घटनांमुळे अर्थव्यवस्थेवर गुणक परिणाम झाला.

-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply