नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : आपले बाह्यरूप कसे आहे यापेक्षा आपण निरोगी असणे महत्त्वाचे असून विनासायास वेटलॉस हा वजन कमी करण्याचा शॉर्टकट नसून ही अवलंबण्यास तुलनेने सोपी अशी आहार पद्धती आहे आणि त्याचे दृश्य परिणामही दिसून येतात, असे उद्गार डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी काढले.
सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 22 ) सिडको भवन येथे करण्यात आले होते.
या वेळी जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, सिडको एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष निलेश तांडेल, सरचिटणीस जे. टी. पाटील, सिडको प्रकल्पग्रस्त एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष विनोद पाटील, सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन अध्यक्ष मिलिंद बागूल आणि सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन कार्याध्यक्ष नरेंद्र हिरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी दीक्षित डाएट प्लॅन म्हणून लोकप्रिय झालेल्या आहार पद्धतीबद्दल माहिती सांगताना श्रीकांत जिचकार हे या आहार पद्धतीचे आद्य प्रचारक असल्याचे सांगत आपण यावर अधिक संशोधन करून ही पद्धती विकसित केल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. ही आहार पद्धती बिनाखर्चाची व अन्य आहार पद्धतींपेक्षा अमलात आणण्यास तुलनेने सोपी असून त्यात वेळोवेळी डॉक्टर वा तज्ज्ञांचा सल्ला घेणे, मन मारून केवळ ठरावीक पदार्थांचे सेवन करणे अशा गोष्टींना अजिबात थारा नाही, असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले. या आहार पद्धतीनुसार आपल्या भुकेच्या वेळा ओळखून दिवसातून फक्त दोन वेळा भोजन करणे आणि 45 मिनिटे चालणे वा सायकलिंगसारखा व्यायाम करून वजन कमी करण्याबरोबरच मधुमेहही नियंत्रणात आणता येतो, असे प्रतिपादन डॉ. दीक्षित यांनी केले. ही आहार पद्धती काटेकोरपणे अमलात आणल्यास वजन व पोटाचा घेर कमी होणे यासारखे चांगले परिणाम दिसून येत असल्याचेही दीक्षित यांनी सांगितले.
निलेश तांडेल यांनी डॉ. दीक्षितांनी आरोग्याची चळवळ सुरू केली असल्याचे सांगत दीक्षित डाएट प्लॅन ही अवलंबण्यास सर्वांत उत्तम आहार पद्धती असल्याचे मत या वेळी बोलताना व्यक्त केले. आपण विकसित केलेला डाएट प्लॅन ही जीवन पद्धती असून या पद्धतीचा अवलंब करून अनेकांच्या आयुष्यात बदल झाला व असे अनेक जण आपल्या विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध मोहिमेशी जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उपस्थित श्रोत्यांपैकी काहींनी विचारलेल्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. या कार्यक्रमास सिडकोतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रिया रातांबे, तर आभार नरेंद्र हिरे यांनी मानले