Breaking News

महामार्गालगत बेकायदा वृक्षतोड

वृक्षप्रेमींकडून कारवाईची मागणी

पनवेल ः वार्ताहर

पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली सर्कलनजीक असणार्‍या पेट्रोल पंपाजवळ महामार्गालगतची चार ते पाच जुनी झाडे कटरने तोडून बेकायदा नामशेष करण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन बेकायदा वृक्षतोड करणार्‍या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.

झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण संतुलित करा, असा मूलमंत्र देणार्‍या शासनाच्या डोळ्यांत धूळफेक करून 10 ते 15 वर्षे वयाची हिरवीगार व सावली देणारी महामार्गालगतची चार ते पाच मोठी झाडे दोन दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे तोडल्याने वृक्षप्रेमी तसेच नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ही झाडे का तोडण्यात आली याची चौकशी व तपास करून वृक्षतोड करणार्‍या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

एकीकडे शासन महामार्गालगत वृक्षलागवडीसाठी लाखो रुपये खर्च करून पर्यावरण संतुलित राखण्याचा मूलमंत्र देत असताना पनवेल-सायन महामार्गालगत असणारी मोठी झाडे तोडणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली सर्कलजवळ असणार्‍या पेट्रोल पंपाजवळ नेहमीच्या वर्दळीच्या स्थळी ही वृक्षतोड करण्यात आली आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीसही कायम तैनात असतात. त्यामुळे या गंभीर घटनेकडे कोणाचेच लक्ष कसे गेले नाही याबाबतही उलटसुलट चर्चा केली जात आहे. कोणतेही झाड तोडण्याआधी त्याची रीतसर परवानगी घेतल्यानंतरच शासनाच्या जागेवर उभी असलेली झाडे तोडता येतात. पनवेल-सायन महामार्गालगत चांगली सावली देणारी झाडे कशासाठी तोडण्यात आली याचा तपास वनविभाग, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच पोलीस खात्याने करून यासाठी जबाबदार असणार्‍यांची कसून तपासणी करून दंडात्मक कारवाईची मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply