शेतकर्यांना भरघोस उत्पन्नाची आशा
माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात यंदाच्या वर्षी भात पिकाचे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले असले, तरी यंदाच्या वर्षी दरवर्षीच्या तुलनेत भातपिकाला पोषक पाऊस, हवामान व वातावरण मिळाल्यामुळे माणगाव तालुक्यात भातपीक उत्तम आले आहे. शेतकर्यांची मेहनत आणि निसर्गाने दिलेली साथ यामुळे शिवारातील शेती चांगलीच फुलली आहे. अनेक ठिकाणी खडकाळ, वरकस जमिनीवरील हळवे पीक तयार झाले आहे. दसर्याला ते पीक काढण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या उत्साहात भर पडली आहे.
माणगावात यंदाच्या वर्षी शेतकर्यांनी 11281 हेक्टरवर भात लागवड केली होती. एका हेक्टरला 1753 किलो भाताचे उत्पादन मिळेल अशी अशा वाटत आहे. त्यामुळे 11281वर सरासरी 360992 क्विंटल उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे माणगावला भाताचे कोठार अशी ओळख कायम राहणार आहे.
या वर्षी मान्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे माणगाव तालुक्यात रोहिणी नक्षत्र सुरू झाल्यापासून धूळ पेरणीवर शेतकरी पेरणी करतात. खरीप हंगामात 11281 हेक्टरवर भात व नाचणीच्या 187 हेक्टरवर पेरणी झाली होती. आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी होता. या वर्षी कृषी विभागामार्फत बियाणे व खते यांचा पुरेसा पुरवठा माणगाव येथे झाल्यामुळे शेतकर्यांना वेळेवर खते व बियाणे उपलब्ध झाली असून कृषी विभागामार्फत बीजप्रक्रिया मोहिमेंतर्गत राबवलेल्या कार्यक्रमामुळे इच्छुक असलेल्या शेतकर्यांनी मागील वर्षी चांगल्या उत्पन्न दिलेल्या बियाणाची ही बीजप्रक्रिया करून लागवड केली होती. त्यामुळे या वर्षीच्या हंगामाची सुरुवात चांगली झाली असून उत्पन्नही चांगले होईल, असे शेतकर्यांना वाटत होते.
माणगाव तालुक्यात सरासरी पर्जन्यमान 3378 मिमी आहे. मागील वर्षाचा पाऊस 3048 मिमी पडला होता. यंदाच्या वर्षीचा पाऊस आजपर्यंत 2872.50 मिमी पडला आहे. गेल्या वर्षी सन 2019-20 मध्ये भात लागवडीचे क्षेत्र 13314 हेक्टर होते, तर चालू वर्षी भात क्षेत्र 11281.62 हेक्टर होते. गेल्या पाच वर्षाची भात पिकाची उत्पादकता 2953 किलो प्रतीहेक्टर होती. यंदाच्या वर्षी पोषक पाऊस पडल्यामुळे प्रतीहेक्टर 3200 किलो अपेक्षित उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकर्यांना वाटत आहे. यंदाच्या वर्षी पारंपरिक व भात पिकाच्या वाणाची लागवड शेतकर्यांनी केली आहे. हे पीक आता पूर्ण तयार झाले असून काही ठिकाणी हळव्या भात पिकाच्या कापणीची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी शेतकर्यांना विक्रमी उत्पादन मिळणार असल्याने त्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.