उरण ः वार्ताहर
भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जेएनपीटीला प्रतिष्ठित अशा सहाव्या अटल शास्त्र मार्केनोमी पुरस्कार 2020मध्ये ‘भारतातील सर्वोत्कृष्ट ग्लोबल पोर्ट’ म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त झाल्याने जेएनपीटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जेएनपीटीला सलग तिसर्यांदा हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला. जेएनपीटीचे डेप्युटी कंजरवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी जेएनपीटीच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
हा पुरस्कार म्हणजे जगभरातील बंदर उद्योगासाठी बेंचमार्क निश्चित करण्याठी जेएनपीटी करीत असलेल्या निरंतर प्रयत्नांची पावती आहे. उत्कृष्ट कार्यप्रणाली तसेच कार्यक्षम, सुरक्षित व विश्वासार्ह कार्यप्रणालीविषयी जेएनपीटीच्या प्रतिबद्धतेचे एक उत्कृष्ट उदाहरणही आहे. गेल्या काही वर्षांत जेएनपीटीने कार्यक्षमता तसेच माल हाताळणी क्षमतेत सुधारणा करण्यासाठी नियोजनबद्धपणे गुंतवणूक केली. जेणेकरून व्यापार अखंडितपणे सुरू राहील व जेएनपीटीच्या विकासाचा मार्गही प्रशस्त होऊ शकेल.