Breaking News

अनोखे सीमोल्लंघन

दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असे पूर्वीपासून म्हटले जाते. परंतु गेली दोन वर्षे हा आनंदच हरपला होता. आता तो परत मिळवायचा आहे. याच दिवशी पांडवांनी अश्मंतक वृक्षाच्या ढोलीत लपवलेली शस्त्रास्त्रे बाहेर काढून आपला अज्ञातवास संपवला होता अशी कथा महाभारतात सांगितली आहे. विराटाघरचा पाहुणचार संपवून पंच पांडव पुन्हा एकदा राजकर्तव्याला भिडले. थोड्याफार फरकाने आपली स्थिती पांडवांसारखीच आहे. ढोलीत लपवलेली आपापली अस्त्रे-शस्त्रे बाहेर काढून पुन्हा एकदा जीवनाला भिडा असा संदेश देणारा यंदाचा दसरा आहे.

भूतकाळातल्या कडवट आणि दु:खद घटना मागे टाकून नव्या युगात पाय ठेवण्याचा दिवस आज उजाडला आहे. मनातील आणि जनातील सारा कडवटपणा मागे टाकून एकमेकांना सौहार्दाचे सोने वाटत दसर्‍याचा सण साजरा करण्याची आपली परंपरा आहे. कोरोना विषाणूच्या भयानक महासाथीमध्ये सारा देश आणि समाज अक्षरश: होरपळून निघाला. जवळपास दीड वर्षे दिवाभितासारखी स्वत:ला घरात कोंडून घेत काढावी लागली. जीवनाचे सारे रस जणु आटून गेले होते. आता मात्र, जुने जाऊ द्या मरणालागुनी असे स्वत:लाच बजावत नव्याने शिलंगण करावयाचे आहे. भारतातील बहुतेक मोठे सण हे कृषीप्रधान संस्कृतीतून जन्माला आले आहेत. सणवारांचे कॅलेंडर बघितले तरीही हे सहज लक्षात येते. पावसाळा संपून नवरात्र आलेले असते. शेतशिवारामध्ये उभे असलेले धान्य कापणीला तयार झालेले असते, अशा काळामध्ये शेतकर्‍याला थोडी सवड असते आणि लवकरच हाती पैसा-अडका येणार असतो. दसर्‍याच्या पाठोपाठ दिवाळी उंबरठ्यावर आलेली असते. म्हणूनच नव्या उत्साहात शेतकरीवर्ग शिलंगणासाठी आतुर असतो. गावाबाहेर जायचे आणि आपट्याच्या झाडाचे मनोभावे पूजन करून त्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटायची असा प्रघात आहे. त्याआधी अनेक घरांमध्ये शस्त्रांचे पूजन होते तर काही घरांमध्ये पोथ्या आणि ग्रंथांची पूजा होते. काही घरांमध्ये यंत्राला फुले वाहिली जातात. तर आजकाल घरच्या वाहनाला हार बांधण्याची नवी परंपरा दिसू लागली आहे. दारात उभी असलेली स्कूटर किंवा चार चाकी मोटार झेंडूच्या फुलांचा हार आणि गंधाचा टिळा मिरवत दिमाखात उभी दिसते. आधुनिक भारताने आपल्या प्राचीन परंपरा युगानुयुुगे कशा वाहात आणल्या आहेत याचेच हे मनोहारी प्रतीक मानावे लागेल. दसर्‍याच्या दिवशी घराघरांमध्ये श्रीखंड-पुरीचा बेत केला जातो. आपल्या संस्कृतीतील साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा हा एक महत्त्वाचा मुहुर्त आहे. धनवंतांच्या घरी या दिवशी सोने किंवा गृहखरेदी होत असते. एकंदरीत समृद्धीची चाहूल देणारा भारतीय संस्कृतीतला दसरा हा मोठाच सण आहे. इतर सण आणि दसर्‍यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे. दिवाळीमध्ये दिव्यांची आरास केली जाते आणि लक्ष्मीची मंगल पावले घरभर उमटावीत, तिचे घरात स्वागत व्हावे असे मंगलमय वातावरण असते. एकंदरीत मौजमजेचे वातावरण असते. दसर्‍याच्या दिवशी देखील मौजमजा अभिप्रेत असते, परंतु त्याचबरोबर कर्तव्याची प्रखर जाणीव देखील व्हावी अशी योजना असते. श्रीखंड-पुरीवर ताव मारायचा पण सीमोल्लंघन करून आपल्या विहित कर्माचा देखील विसर पडू द्यायचा नाही असे शिलंगणाची परंपरा सांगत आली आहे. मनातील अमंगळाचा रावण जाळून टाकून मंगलमय आणि समृद्ध अशा प्रदेशात सीमोल्लंघन करण्याचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी शुभंकर ठरो हीच प्रार्थना.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply