पनवेल : प्रतिनिधी
प्रशासनाला मित्र माना, आम्हीही डॉक्टर्सना सर्वतोपरी मदत करू, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकारी आणि पालिका क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्या टास्क फोर्सच्या ऑनलाइन बैठकीत सांगितले. शासनाने कोविड रूग्णालयांना परवानगी देताना स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट विषयी जे नियम सांगितले आहेत ते पाळले जात आहेत की नाही यांची शहानिशा करूनच या रूग्णालयांना परवानगी दिली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. बालरूग्णांलयांनी संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजन, औषधे यांचा साठा करून ठेवण्याविषयीच्या सूचना यावेळी आयुक्तांनी केल्या. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी बालरूग्णांलयांनी पॉझीटिव्ह येणार्या लहान मुलांची माहिती पालिकेला कळविण्याबाबतच्या सूचना डॉक्टरर्सना दिल्या. या वेळी टास्क फोर्सचे सदस्य डॉ. जय भांडारकर यांनी संभाव्य लाटेत गंभीर परिस्थितीमधील लहान मुलांवर उपचार करण्यासाठी प्राथमिक स्वरूपातील ट्रेनिंग परवानगी मिळणार्या रूग्णालयातील स्टाफला देणे गरजेचे असल्याचे सांगितले. एमजीएम रूग्णालयदेखील तिसर्या लाटेच्या दृष्टीकोनातून तयारी करत असल्याचे एमजीएम रूग्णालयाचे डॉ. विजय कमले यांनी सांगितले. संभाव्य तिसर्या लाटेमध्ये पालिकेला आम्ही संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन यावेळी सर्व डॉक्टरांच्यावतीने देण्यात आले. या ऑनलाइन बैठकिस उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. पूनम जाधव, टास्क फोर्सचे सदस्य, इतर तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.