Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रातील मुस्लीम, ख्रिश्चन, बोहरी समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न मार्गी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुस्लीम, ख्रिश्चन आणि बोहरी समाजाच्या दफनभूमीचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. याबाबत तिन्ही समाजांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी (दि. 26) आयुक्त गणेश देशमुख यांच्या दालनात झाली. या वेळी आयुक्तांनी दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, कळंबोलीतील भाजप युवा कार्यकर्ते जमीर शेख यांच्यासह मुस्लीम, ख्रिश्चन आणि बोहरी या तिन्ही समाजांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कळंबोली सेक्टर 12, प्लॉट नंबर सी 2ए येथे असलेला 42 गुंठ्यांचा भूखंड मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी विभागून देण्याचे ठरले. बोहरी समाजाला खारघर सेक्टर 14, प्लॉट नंबर 15 हा भूखंड दफनभूमीसाठी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल मधील एक भूखंड बोहरी समाजाला दफनभूमीसाठी देण्याचे ठरले. याबद्दल तिन्ही समाजाच्या पदाधिकारी व बांधवांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

समाजाला दफनभूमीसाठी जागा उपलब्ध व्हावी याकरिता दीड वर्षापूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांना विनंती केली होती. याबाबत त्यांनी तत्काळ सभागृह नेते परेश ठाकूर यांना पाहणी करायला सांगितले. त्यानुसार पाहणी होऊन तुमची मागणी रास्त आहे, आम्ही यासाठी प्रयत्न करू, असा शब्द परेश ठाकूर यांनी दिला होता. याकामी आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर यांनी पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. दफनभूमीच्या जागेबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. याबद्दल मी आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर यांचे आभार मानतो.
-बशीर शेख, उपाध्यक्ष खैरूल इस्लाम ट्रस्ट, कळंबोली तथा माजी सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी

ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमीची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली होती. त्यांनी तत्काळ यात लक्ष देण्याचे मान्य केले. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीत प्रत्यक्ष भेट दिली होती. त्या वेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानुसार दफनभूमीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याबद्दल आभार मानतो.
– फादर शाजी जोसेफ, सेक्रेटरी, रायगड ख्रिश्चन असोसिएशन

Check Also

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच …

Leave a Reply