खरे म्हणजे भारताशी दीर्घ काळ चांगले संबंध असलेला बांगला देश हा एकमेव शेजारी देश आहे असे म्हणता येईल. त्यामुळे तेथे घडणार्या घटनांची दखल घेणे भारतीय नेतृत्वासाठी आवश्यक ठरते. तेथे धार्मिक तेढ वाढवण्याचे कारस्थान हे केवळ त्या देशासाठीच घातक ठरणार नाही तर विकासाच्या आकांक्षा घेऊन पुढे जाऊ पाहणार्या दक्षिण आशियाई क्षेत्रातील सर्वच देशांच्या वाटचालीत अडथळा निर्माण करणारे ठरेल.
जगाची राजकीय परिस्थिती अतिशय झपाट्याने बदलते आहे. या राजकीय बदलांना अनुरूप अशी भूमिका प्रत्येक देशातील नेतृत्वास घ्यावीच लागते. भारतासारख्या देशाला शेजारी राष्ट्रांमधील राजकीय आणि सामाजिक बदल अनेकदा त्रासदायक ठरत असतात. पाकिस्तानसारखे शत्रूराष्ट्र हे मुळात भारतद्वेषाच्या पायावरच उभे राहिले आहे. भारताच्या हिताचे निर्णय पाकिस्तानचे नेतृत्व कधीही घेणार नाही हे तर उघड आहे. तशी अपेक्षा ठेवणेच भाबडेपणाचे ठरेल. भारताचा दुसरा शेजारी म्हणजे चीन सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहे. या देशाची विस्तारवादाची भूक नेहमीच भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे. आता या घटकेला अरुणाचल प्रदेशनजीक सरहद्दीवर चीनने लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. त्याला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे. गेला काही काळ चीनशी जवळीक साधणार्या नेपाळशी आपले संबंध सध्या तरी जेवढ्यास तेवढे आहेत. श्रीलंकेशी भारताचा संबंध नेहमीच सहकार्याचा राहिला आहे. राहता राहिला बांगला देश. बांगला देशाच्या जन्मालाच भारत कारणीभूत ठरला हा इतिहास आहे. बांगला देशामध्ये बहुसंख्य मुस्लिम आणि तेथील अल्पसंख्याक हिंदू समुदाय हे दोन्हीही बर्यापैकी बंधुभावाने आजवर नांदत आले आहेत. तुरळक कुरबुरी वगळल्या तर चिंता करण्याचे फारसे कारण नव्हते. परंतु बांगला देशातील ताज्या घटना या निश्चितच चिंतित करणार्या आहेत. तेथे दुर्गापूजेचा उत्सव सुरू असताना झालेले हल्ले, लुटालूट आणि जाळपोळ यात अल्पसंख्य हिंदू समाजाला लक्ष्य करण्यात आले. समाजमाध्यमांवरील धार्मिक भावना दुखावणार्या काही मजकुरामुळे हा उद्रेक झाल्याचे सांगण्यात येते. परंतु त्याची व्याप्ती पाहता विशिष्ट हेतूने रचलेले कारस्थान त्यामागे स्पष्ट दिसते. हे जाळपोळीचे प्रकार केवळ बांगला देशापुरते मर्यादित राहात नाहीत. त्याचे पडसाद भारतात देखील उमटू शकतात हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. अफगाणिस्तानातील सत्तांतर आणि सत्तेवर आलेले कडवे तालिबानी यांच्यामुळे दक्षिण आशियामध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यात बांगला देशातील घटनांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. मुळात बांगला देशाची निर्मिती प्रामुख्याने भाषेच्या आधारावर झाली. त्या देशाला पाकिस्तानी व्यवस्थेविरुद्ध स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारताने मोलाची कामगिरी बजावली. 1971च्या युद्धानंतर स्वतंत्र बांगला देश अस्तित्वात आला. या उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांची पन्नाशी नुकतीच साजरी करण्यात आली. इतके दिवस उभय देशांमध्ये जोपासल्या जाणार्या सौहार्दाला नख लावणार्या शक्ती तेथे कार्यरत झाल्या आहेत असे दिसते. चीनचा बांगला देशात शिरकाव वाढत आहे ही खरी भारताची सगळ्यात मोठी चिंता आहे. समाधानाची बाब म्हणजे बांगला देशातील हिंदुंवर झालेल्या हल्ल्यांबाबत गुन्हेगारांना कठोर शासन होईल अशी ग्वाही त्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिली आहे. परंतु एवढ्यावर भागणार नाही. बांगला देशात दुभंगलेपण आणण्याचा प्रयत्न करणार्या परकीय शक्तींना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ आहे.