Breaking News

फणसाड अभयारण्यात आढळले देशातील सर्वांत मोठे फुलपाखरू

 भीमपंखी फुलपाखराची नोंद; शास्रोक्त पद्धतीने पक्षीगणना

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील फणसाड अभयारण्यात नुकतेच तीन दिवसीय पक्षी व इतर वन्यजीव गणना करण्यात आली. त्यात 155 पक्षी प्रजातींची नोंद झाली. या वेळी ’भीमपंखी’ या भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू आढळले.

महाराष्ट्र शासन वन्यजीव विभाग आणि ग्रीन वर्क ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फणसाड अभयारण्यातील  पक्षी व इतर वन्यजीवांची गणना करण्यात आली, वन्यजीव विभाग व ग्रीन वर्क ट्रस्टच्या सुमारे 60 सदस्यांनी केलेल्या या पक्षी गणनेत तीन दिवसाच्या कालावधीत 155 पक्षी प्रजातींची नोंद झाली. तसेच 17 प्रजातींचे साप, 12 उभयचर प्राणी , 16 सस्तन प्राणी, 25 प्रजातींचे कोळी, 14 सागरी जीव आणि 50 प्रजातींची फुलपाखरे यांचीदेखील नोंद घेण्यात आली. त्यात  खाटीक, बेडूक मुखी,  कोकीळ, विविध प्रजातीचे घुबड, निळ्या चष्म्याच्या मुंगश्या, मलबारी कवड्या, धनेश, रंगीत तुतारी, कोतवाल, तिर चिमणी, टिकेलचा कस्तुर, इत्यादी दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे.

उपवनसंरक्षक बी. एन. पिंगळे, सहायक वनसंरक्षक एन. एन. कुप्ते यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी ही पक्षी गणना केली. तज्ज्ञ व्यक्तींकडून पडताळणी केल्यानंतरच या गणनेस मंजुरी देण्यात आली.

असे आहे भीमपंखी फुलपाखरू

या पक्षी गणनेदरम्यान ’भीमपंखी’ हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू पाहण्यात आले. हे फुलपाखरू देशात दापोलीपासून दक्षिण किनारपट्टी व पश्चिम घाटात दिसते तसेच दक्षिण पूर्व घाटातील काही भागात दिसते. फणसाड अभयारण्यात सुमारे 20 वर्षांपूर्वी या फुलपाखराचे दर्शन झाल्याचे ऐकिवात होते, परंतु 30 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता भीमपंखी फुलपाखराचे दर्शन झाले, ही फणसाड अभयारण्यातील या फुलपाखराची सर्वात पहिली नोंद आहे.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply