नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर आगामी वेस्ट इंडिज दौर्याआधी फिटनेस टेस्ट देणार आहे. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत शंकरला ही टेस्ट द्यावी लागेल. विश्वचषक स्पर्धेत सरावादरम्यान जसप्रीत बुमराहचा यॉर्कर चेंडू विजय शंकरच्या पायाला लागला होता. या दुखापतीमुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते.
विश्वचषक स्पर्धेसाठीच्या 15 जणांच्या भारतीय संघात विजय शंकरची निवड करण्यात आली होती. शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधीही मिळाली, मात्र या संधीचे सोने करणे त्याला जमले नाही. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ विंडीज दौर्यावर जाणार आहे. त्यामुळे या दौर्याआधी विजय शंकर आपल्या दुखापतीमधून कसा सावरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतीय संघ विंडीज दौर्यावर दोन कसोटी, प्रत्येकी तीन वन डे व ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 3 ते 8 ऑगस्ट या कालावधीत ट्वेन्टी-20 मालिका होईल. त्यापाठोपाठ 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन वन डे आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.