Breaking News

भाजप महिला मोर्चाच्या दणक्याने शिवाजीनगरमधील पाणीपुरवठा सुरळीत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील गव्हाण शिवाजीनगर येथील पाणीप्रश्नी भाजप महिला मोर्चाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या सीबीडी-बेलापूर येथील रायगड भवन कार्यालयावर धडक देत तसेच अधिकार्‍यांना गावात पाचारण करून जाब विचारला. भाजपच्या या दणक्यामुळे शिवाजीनगरचा पाणीप्रश्न सुटला आहे.
सिडकोच्या दुर्लक्षामुळे शिवाजीनगर येथे पाणीटंचाई निर्माण झाली होती. सिडकोने हेटवणे धरणातून शिवाजीनगरला होणारा पाणीपुरवठा बंद केल्याने गेली 15 दिवस येथे पाणी येत नव्हते. नागरिकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाची भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी दखल घेत सरपंच हेमलता भगत, सदस्य विजय घरत, तालुका सरचिटणीस योगिता भगत, तसेच नंदा ठाकूर, भागिरथी मोकल, गीता मोकल, आशा म्हात्रे यांच्यासह सिडकोच्या सीबीडी-बेलापूर येथील कार्यालयावर सोमवारी (दि. 15) धडक दिली.
सिडकोकडून शिवाजीनगरला पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे, मात्र पाणीपुरवठा केला जात नाही हे रत्नप्रभा घरत व सहकार्‍यांनी या वेळी सिडकोचे अधिकारी गजानन दलाल, नलावडे, भोवरे, चव्हाण, देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले, तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही जनतेचा हा प्रश्न तातडीने सोडवा, असे अधिकारीवर्गाला फोनवरून सूचित केले. यानंतर भाजप शिष्टमंडळाने अधिकारीवर्गाला परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गावात पाचारण केले. तेथे सिडकोकडून अधिकृतरीत्या घेण्यात आलेले पाण्याचे कनेक्शन दाखविण्यात आले. आजच्या आज पाणी आले पाहिजे; अन्यथा तुम्हाला परत जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला. त्यानंतर लागलीच कार्यवाही होऊन पाणीपुरवठा पूर्ववत झाला.
याकामी सुजित ठाकूर, नितीन ठाकूर, किसन मोकल, शशिकांत ठाकूर, महेश ठाकूर, चिंतामण ठाकूर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवाजीनगर ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, रत्नप्रभा घरत व सहकार्‍यांसह भाजपचे आभार मानले आहेत.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply