पुढील वर्षभरात कोणते शेअर वधारतील आणि सेन्सेक्स, निफ्टी किती परतावा देतील, असे अंदाज दिवाळीच्या मुहूर्ताला देण्याची पद्धत आहे. याही वर्षी सर्व प्रमुख ब्रोकर्सनी असे काही शेअर्स सुचविले आहेत. अशा काही शेअर्सवर लक्ष ठेवून त्यात गुंतवणूक करण्यासाठी त्यातील चांगल्या शेअर्सची निवड गुंतवणूकदारांना सोपी व्हावी म्हणून अशा शेअर्सचा हा आढावा…
मागील 23 वर्षांहून अधिकचा अनुभव सांगतो की जेव्हा बाजारामध्ये तेजी असते तेव्हा बाजारातील प्रत्येक विश्लेषक तेजीबद्दलच बोलताना दिसतो आणि मग पुढील एक-दोन वर्षांत सेन्सेक्स कुठपर्यंत जाईल याबद्दल वल्गना करताना स्वतःला कधीच मागं ठेवत नाही.. परंतु जेव्हा बाजार आपल्या उच्चांकापासून 20 टक्क्यांहून अधिक खाली आलेला असतो तेव्हा हेच विश्लेषक निराशावादी राग आळवताना आढळतात. बाजारातील प्रवाहाविरुद्ध कोणीच बोलायचं धाडस करत नाही हेच खरं.. याच तेजीमधील उदाहरण पाहूयात. मागील सुमारे एक वर्षभर फार्मा कंपन्यांची बूम पाहायला मिळाली. अगदी सनफार्मा, डिवीज् लॅब, डॉक्टररेड्डीज पासून अगदी छोट्या छोट्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव एका वर्षात कमीत कमी दुप्पट झाले आणि त्या सुमारास सगळेच विश्लेषक आपल्या पोर्टफोलिओमध्ये भरभरून फार्मा कंपन्यांवर जोर देऊन होते व टीव्हीवरील तज्ज्ञ रोज उठून त्यांबद्दलच बोलत होते. तीच गोष्ट स्पेशालिटी केमिकल्सबद्दल व आयटी कंपन्यांच्या बाबतीत पाहावयास मिळाली. अगदी परवाच चालू झालेल्या नवीन संवतसाठी मुहूर्त सेशन पार पडलं आणि त्याआधी अनेक ब्रोकर्सनी आपल्या रिसर्चनुसार कांही कंपन्या सुचवल्या आहेत. आज त्यांचा आढावा घेऊयात.
या वर्षी एका आघाडीच्या चॅनेलच्या पोलमध्ये भाग घेतलेल्या डझनभर ब्रोकर्सनीही संवत 2078 मध्ये बाजारामधून 12-20 टक्के परतावा सुचवला आहे. एकंदरीत, सेन्सेक्स 72,000 आणि निफ्टी 21,500 चे अनुमान करणारी विधाने समोर येत आहेत, परंतु दरवर्षीप्रमाणे, सर्वच शेअर्स तुम्हाला उत्तम परतावा देतील असं नाही, परंतु कोटक सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल, आनंद राठी, जिओजित, एंजल वन, प्रभुदास लीलाधर, रिलायन्स सिक्युरिटीज, प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज, रेलिगेअर अशा ब्रोकर्सनी काही अपवाद वगळता यंदाच्या वर्षी लार्जकॅप कंपन्यांवरच भर दिलेला आढळत आहे. खालील तक्त्यामध्ये काही आघाडीच्या ब्रोकर्सनी सुचवलेल्या कंपन्या मांडलेल्या आहेत.
आयसीआयसीआय बँक : वर उल्लेखलेल्या ब्रोकर्सव्यतिरिक्त देखील अनेकांनी आयसीआयसीआय बँकेस सर्वाधिक पसंती दिलेली दिसत आहे. या बँकेला पत वाढ, उच्चांकापासून घसरलेले एनपीएव क्रेडिट खर्च आणि परतावा गुणोत्तर यातून फायदा होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे, तसेच ऑपरेटिंग पॅरामीटर्समध्ये सतत सुधारणा केल्यामुळे या बँकेच्या शेअरच्या भावाचं स्थिर असं री-रेटिंग होईल असे मत प्रभुदास लीलाधरनं व्यक्त केलंय.
स्टेट बँक : देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ही चांगल्या पीसीआरसह, भारतीय अर्थव्यवस्थेत हळूहळू पुनर्प्राप्तीसाठी सर्वोत्तम पर्याय आढळत आहे. मजबूत दायित्व फ्रँचायझी आणि सुधारित कोर ऑपरेटिंग नफा, कमाईमध्ये मजबूत नोंदवलेली वाढ व क्रेडिट खर्च सामान्यीकरणामुळे मोतीलाल ओसवालच्या दृष्टीकोनातून ही बँक एका चांगल्या स्थितीत दिसते.
एचडीएफसी बँक : परकीय गुंतवणूकदार संस्था तसेच स्थानिक म्युचअल फंड्स यांची लाडकी असलेली एचडीएफसी बँक एक चोख परफॉर्मर म्हणून आपला दावा सांगते.
एल अॅण्ड टी : रिलायन्स सिक्युरिटीज आणि प्रभुदास लीलाधर यांनी शिफारस केलेले एल अॅण्ड टी हे आणखी एक नाव आहे ज्यानं मागील सहा महिन्यांत वेग पकडलेला आहे. सरकारचं पायाभूत सुविधांवर वाढलेलं लक्ष हे कंपनीच्या उपकंपन्यांच्या दृष्टीनं फायद्याचं ठरत असून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा फायदाही कंपनीस होताना दिसत आहे. एल अॅण्ड टीनं इन्फ्रा आणि टेक्नॉलॉजीमध्ये परिवर्तन आणलेलं असून ही कंपनी L&T Infotech, L&T Tech Services आणि Mindtree नियंत्रित करत असल्यामुळे अर्थव्यवस्थेतील केलेल्या भांडवली खर्चावरील (कॅपेक्स) रिकव्हरी, पायाभूत विकास आणि आयटी सेवांमधील मजबूत आधारामुळं कंपनीस सर्वात मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. या कंपन्यांचा SOTP (sum-of-the-parts) मूल्याच्या 40 टक्के असून एल अॅण्ड टीने पुढील 3-5वर्षांमध्ये स्थिर परतावा दिला पाहिजे, असं विश्लेषकांना वाटतं.
अशोक लेलँड : या यादीत स्थान मिळविणार्या ऑटो क्षेत्रातील एकमेव नाव असलेल्या अशोक लेलँडला येत्या काही वर्षांत व्यावसायिक वाहन चक्रीय पुनर्प्राप्तीतून फायदा होईल, असं विश्लेषकांना वाटत आहे.
अल्ट्राटेक सिमेंट : सिमेंट क्षेत्रातील एकमेव प्रतिनिधी असलेल्या अल्ट्राटेक सिमेंटकडे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं एक संरचनात्मक पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. कंपनीच्या वेगवान विस्तार योजनांमुळे येत्या काही वर्षांत कंपनीच्या वाढीमध्ये भर पडेल असे विश्लेषकांना वाटतं.
याखेरीज जर प्रामुख्यानं लार्जकॅप कंपन्यांचाच विचार केल्यास अदानी ग्रीन, अॅक्सीस बँक, सीडीएसएल, इंडिगो, महिंद्रा महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा केमिकल्स, टीसीएस, टाटा मोटर्स (डीव्हीआर), टाटा पॉवर, टाटा स्टील बीएसएल या कंपन्यांस माझी पसंती राहील.
अदानी ग्रीन : अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (अॠएङ) ही भारतातील सर्वात मोठ्या रिन्यूएबल ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे, ज्याची वर्तमान प्रकल्प क्षमता 1399 मेगा वॉट आहे. अदानी ग्रीन एनर्जी ही अनेक उपकंपन्यांची एक होल्डिंग कंपनी आहे जी रिन्यूएबल ऊर्जा निर्मितीच्या व्यवसायात आहे. कंपनी प्रामुख्याने नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती आणि इतर पूरक क्रियाकल्पांमध्ये गुंतलेली आहे. सौरऊर्जा, पवनऊर्जा, हायब्रीड पॉवर व सोलर पार्क्स ही कंपनीची प्रमुख उद्दिष्टं आहेत. 2025 वर्षापर्यंत 25 गेगा वॉट क्षमता देशाला पुरवण्यासाठी उपलब्ध करून देण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. एकूणच आगामी ईव्ही गाड्यांचा कल, कोळशाचा तुटवडा, परंपरागत ऊर्जा पर्यायांमुळं होणारं उत्सर्जन व प्रदूषण या सर्वांचा विचार केल्यास ही कंपनी एक उत्तम गुंतवणूक पर्याय ठरू शकते.
अॅक्सिस बँक : इतर खाजगी बँकांबरोबर अॅक्सिस बँक हा देखील एक चांगला गुंतवणूक पर्याय ठरू शकते. हा शेअर आपल्या 52 आठवडी उच्चांकापासून सुमारे 13 टक्के खाली आलेला असून बँकेची उपकंपनी अॅक्सिस म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा आकार लक्षात घेऊन त्याचंदेखील मूल्य गृहित धरता ही बँक उजवी वाटते.
सीडीएसएल : आज टेक्नॉलॉजी आधारीत सर्व डिस्काऊंट ब्रोकर्स (पेटीएम, झिरोधा, अपस्टॉक्स, ग्रो, फायर्स, अलाईस ब्लू) व आघाडीएचे ब्रोकर्स जसे की मोतीलाल ओसवाल, एंजेल वन, प्रॉफीटमार्ट यांद्वारे उघडली जात असलेली डिमॅट खाती ही सीडीएसएल मध्येच उघडली जात असून खातेधारकांना आपले शेअर्स विकताना सीडीएसएल ही कंपनी प्रति विकल्या जात असलेल्या स्क्रिपसाठी सात रुपयांपासून चार्जेस लावते. गेल्या वर्षा-दीड वर्षात सुमारे दीड कोटी खाती उघडली गेली असून येणार्या वर्षात ही संख्या वाढतच राहणार आहे आणि याचा भरघोस फायदा या कंपनीस झाल्यावाचून राहणार नाही.
इंडिगो : देशांतर्गत एव्हिएशन इंडस्ट्रीजमध्ये व्यावसायिक असा सध्यातरी केवळ एकच तगडा दावेदार आहे, बाजारातील जवळपास 57 टक्के हिस्सा ही कंपनी राखून आहे. अनलॉकिंग नंतर यास गती मिळणार यात नवल नाही.
महिंद्रा महिंद्रा : 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीच्या 181 उपकंपन्या होत्या. यापैकी काही शेअर बाजारात देखील सूचीबद्ध आहेत, कंसातील आकडे कंपनीचा हिस्सा दर्शवते. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस (52.3%), महिंद्रा हॉलिडेज आणि रिसॉर्ट्स (67.77%), महिंद्रा लॉजिस्टिक (58.3%), टेक महिंद्रा (28.8%), महिंद्रा उखए ऑटोमोटिव्ह (11.4%), महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स (50.0%), स्वराज इंजिन (34.7%), महिंद्रा ईपीसी सिंचन (54.4%). या गुंतवणुकीची बाजारमूल्ये त्यांच्या पुस्तकी मूल्यापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहेत, ज्यामुळे चच् च्या एकूण आर्थिक लवचिकतेला एक आधार मिळतो. 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत वर नमूद केलेल्या कंपन्यांमधील महिंद्रा अँड महिंद्राचा हिस्सा 607 अब्ज रुपयांचा आहे. अशी ही होल्डिंग कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये नको का ?
रिलायन्स इंडस्ट्रीज : नुकत्याच दिवाळी निमित्त जिओ व गूगल यांच्या समन्वयानं लाँच केलेल्या स्वस्तातील 4 जी फोनचं उद्दिष्ट हेच आहे की, अजूनही फिचर फोन व 2 जी वापरणारी तमाम जनता 4 जी ची मजा घेऊ शकेल आणि ज्याचा थेट फायदा कंपनीस होऊन देशातील डिजिटल क्रांतीचं उद्दिष्ट गाठत कंपनीचं प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न (अठझण) वाढण्यास मदत होईल. एकूणच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपन्या, जिओचं व रिलायन्स रिटेल यांचं एकत्रित मूल्य हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मूल्यापेक्षा अधिक आहे. यावरून हा शेअर किती अंडरव्हॅल्यूड आहे याची कल्पना येऊ शकते.
टाटा केमिकल्स : सेल्ल्युलर फोन आणि लॅपटॉपच्या वापरामधील वाढीसह इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्राचा विकास, यांमुळं समाप्त होणार्या लिथियम-आयन बॅटरीच्या वापराचं प्रमाण वाढत आहे. टाटा केमिकल्सनं त्यांच्या लिथियम-आयन बॅटरी व्यवसायात वर्तुळाकार अर्थव्यवस्था स्थापित केली आहे. लिथियम आयन बॅटरीज रिसायकलिंग करून, कंपनी या उत्पादनांचा भाग असलेल्या बॅटर्यांना मौल्यवान साहित्य पुनर्प्राप्त करून देऊ शकते आणि शाश्वत उपाय वितरीत करण्यासाठी विज्ञानाचा फायदा घेते.
टीसीएस : अग्रगण्य अशी विस्तृत अव्वल आयटी सेवा पुरवणारी टाटा समूहातील लार्जकॅप कंपनी, यापेक्षा या कंपनीबद्दल अधिक सांगण्यास नको.
टाटा मोटर्स (डीव्हीआर) : एकूणच टाटा मोटर्सची चलती असल्यानं त्याची परछायी असलेली ही कंपनी तितकाच परतावा देऊ शकते. डिफरन्शिअल व्होटिंग राईट्स म्हणजेच डीव्हीआर म्हणजे या शेअरहोल्डर्सना इतर शेअर होल्डर्सपेक्षा कमी मताधिकार असतात आणि कंपनीचं प्रभावी नियंत्रण कमी न करता बाजारात पैसे उभे करायचे असल्यास कंपन्या या प्रकारचे शेअर्स प्रदान करतात.
टाटा पॉवर : कोळशावर आधारित उत्पादनात 3.2% वाढ आणि सौर उत्पादनात 30% वाढ असूनहीसुमारे भारतातील विजेची मागणी ऑक्टोबरच्या पहिल्या सहामाहीत 5% वाढली व मागणीच्या तुलनेत पुरवठा 1.4 नी कमी झाला. वाढतं शहरीकरण, भविष्यात परवडणार्या, स्वच्छ आणि विश्वासार्ह वीज पुरवठ्याकडं लक्ष केंद्रित करत असून वीज क्षेत्रात यामुळे सतत वाढ होण्यास मोठा वाव मिळाला आहे. सध्या, टाटा पॉवर ही 11 राज्यांमध्ये 2.6 गिगावॅट (ॠथ) क्षमतेची अक्षय ऊर्जा क्षमता असलेली देशातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी आहे.
टाटा स्टील बीएसएल : कर्जबाजारी भूषण स्टील आता टाटा स्टील बीएसएल म्हणून ओळखली जाते. आपल्या पुस्तकी किंमतीच्या केवळ 1.18 पट किंमत असलेली ही कंपनी आपल्या इतर स्पर्धकांपेक्षा पायाभूत विश्लेषणात सरस वाटते.
(अस्वीकृती : शेअरबाजारातील गुंतवणूक ही अत्यंत जोखमीची गुंतवणूक असून या हा लेख सामान्य वाचकांसाठी माहितीपूर्ण आणि शैक्षणिक हेतूंसाठी बनविला गेला आहे आणि यामध्ये लेखकानं आपल्या वैयक्तिक अभ्यासानुसार आपली वैयक्तिक मतं मांडलेली असून लेखक कोणत्याही शेअरच्या खरेदी/विक्रीची शिफारस करत नाही. वाचकांनी आपली गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहितीची पुन्हा पडताळणी करावी व आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)
-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com