Breaking News

संधी आहे, पण पारंपरिक चष्मा बदलावा लागेल !

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने संघटीत होते आहे, असे सांगणारा स्टेट बँकेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा बदल सर्वव्यापी आणि अपरिहार्य असल्याने त्याच्याकडे स्वच्छ दृष्टीने पाहण्याची गरज आहे. तसे पाहणार्‍यांना या बदलातील संधी दिसेल. जे पारंपरिक चष्मा बदलणार नाहीत, त्यांना हा बदल स्वीकारणे निश्चितच जड जाईल. आपण त्याकडे कसे पाहणार आहोत?

गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालावर प्रथमदर्शी संपूर्ण विश्वास बसत नाही, पण तो नाकारताही येत नाही. त्याचे कारण आजूबाजूला ते उघड्या डोळ्यांनी दिसते आहे. आजूबाजूला होत असलेल्या आर्थिक व्यवहारांकडे तुम्ही थोडे जाणीवपूर्वक लक्ष दिले की या अहवालाचे आपल्याला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मुद्दा हा आहे की आपण त्याच्यापासून काही बोध घेणार आहोत की त्याच त्याच पारंपरिक चष्म्यातून त्याकडे पाहून तो नाकारणार आहोत? गेल्या तीन दशकात जागतिकीकरणाचे वारे असो, संगणकीकरणातून आणि त्यानंतर आलेल्या इंटरनेटचा बदल असो किंवा अगदी अलीकडे झालेली डिजिटल क्रांती असो, असे सर्व मोठे बदल एकामागून एक होत गेले. ज्यांनी त्यांचे महत्त्व लक्षात घेतले, त्यांनी आपले व्यवहार त्याप्रमाणे बदलून घेतले. काहींनी त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. तर कोणी त्याकडे तात्कालिक, न टिकणारे बदल म्हणून दुर्लक्ष केले. काहींनी त्याला विशिष्ट विचारसरणीचे नाव दिले. अर्थात, हे बदल इतके व्यापक होते की ते काही होण्याचे थांबले नाहीत. उलट, ज्यांनी आपले चष्मे बदलले नाहीत, त्यांची फरपट झाली. या सर्व पार्श्वभूमीवर या ताज्या अहवालाने ज्या बदलावर भाष्य केले आहे, तोही असा सर्वव्यापी, अपरिहार्य बदल असून त्याकडे स्वच्छ दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

आणखी एक महत्त्वाचा बदल

आपल्या देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक; देशातील आर्थिक स्थिती आणि बदलांविषयी अभ्यास करते आणि त्याचा अहवाल प्रसिद्ध करते. आर्थिक आघाडीवर देशात काय चालले आहे, ते समजण्यास त्यामुळे मदत होते. देशातील संघटीत आणि असंघटीत अर्थव्यवस्थेमध्ये नेमके काय चालले आहे, याविषयीचा स्टेट बँकेचा याच मालिकेतील अहवाल गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाला. देशातील अर्थव्यवस्था किती वेगाने संघटीत होते आहे, याचा या अहवालात आढावा घेण्यात आला आहे. ती संघटीत होते आहे, याची शेकडो उदाहरणे आपल्याला दररोज पाहायला मिळत आहेत. या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. इंटरनेटच्या मदतीने वाढलेले ई-कॉमर्स असेल, जीएसटी करपद्धतीमुळे व्यापारउदीमात आणि रेरासारख्या कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात झालेला बदल असेल, डिजिटल व्यवहारांमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये आलेला वेग आणि पारदर्शकता असेल, अशा सर्व मार्गांनी अर्थव्यवस्था संघटीत होताना आपल्याला दिसतेच आहे. तीच गोष्ट या अहवालात आकडेवारीने सिद्ध केली असून देशाच्या तसेच आपल्या वैयक्तिक भवितव्याच्या दृष्टीने या बदलाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे त्या अहवालात काय म्हटले आहे, हे जाणून घेतलेच पाहिजे.

स्टेट बँकेचा अहवाल काय म्हणतो?

स्टेट बँकेचा हा अहवाल काय म्हणतो, ते आपण काही मुद्द्यांच्या स्वरूपात पाहू. 1.अनेक कारणांनी विशेषतः कोरोनासारख्या अभूतपूर्व साथीमुळे झालेल्या बदलांनी असंघटित अर्थव्यवहार 2020-21मध्ये 15 ते 20 टक्क्यांनी कमी झाले आहेत. 2. बँकिंगला सरकार देत असलेले प्रोत्साहन आणि त्या पाठोपाठ झालेल्या नोटबंदीने असंघटित उद्योग व्यवसाय संघटीत होण्यास सुरुवात झाली. 3. वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी या अप्रत्यक्ष करामुळे या प्रक्रियेने वेग पकडला. तो वेग कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीने अधिकच वाढला. कारण कोरोनामध्ये मोठ्या उद्योगांमध्ये निर्मिती सुरू होती, पण छोट्या उद्योगांना त्या स्थितीत तग धरणे अवघड होते. 4. या काळात असंघटीत अर्थव्यवस्थेतून संघटीत अर्थव्यवस्थेकडे सुमारे 13 लाख कोटींचा व्यवहार आला. 5. 2011च्या जनगणनेत असंघटीत हॉटेल, वाहतूक, दूरसंचारचा वाटा 40 टक्के होता. बांधकाम क्षेत्राचा वाटा 34 टक्के, तर उत्पादनाचा वाटा 20 टक्के होता. त्यामध्ये आता मोठा बदल झाला असून गेली काही वर्षे होत असलेल्या आर्थिक सुधारणांमुळे त्याचा वेग वाढत चालला आहे. 6. सर्व अनुदाने आणि सरकारी मदत आता डीबीटी पद्धतीने थेट लाभधारकांच्या खात्यात जमा होत असल्याने तो व्यवहार पारदर्शी झाला आहे. त्यामुळे तो पैसा कसा फिरतो, हे पाहणे शक्य झाले आहे. 7. उद्योग व्यवसायिकांना कामगारांची नोंद करणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2018 ते जुलै 2021 या काळात 36.6 लाख रोजगारांची संघटीत क्षेत्रात नोंद झाली आहे. (ईपीएफओ) तर अगदी अलीकडील ई-श्रम पोर्टलमुळे (ज्यावर दोनच महिन्यात 5.7 कोटी असंघटित कामगारांची नोंद झाली आहे.) या प्रक्रियेला आणखी गती मिळाली आहे. 8. आतापर्यत शेती क्षेत्र हे 100 टक्के असंघटित असे मानले जात होते, पण गेल्या काही वर्षांत बँकिंग आणि किसान क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. त्यामुळे त्यातील 20 ते 25 टक्के भाग संघटीत क्षेत्रात आला आहे. सध्या साडेसहा कोटी किसान क्रेडिट कार्ड वापरात असून त्याद्वारे होणारे आर्थिक व्यवहार 4.6 लाख कोटींवर गेले आहेत. 9. अर्थव्यवस्था संघटीत होण्याचा हा वेग इतर अनेक देशांपेक्षा अधिक आहे. गेल्या काही वर्षातील आर्थिक सुधारणा आणि कोरोना साथीमुळे असे झाले आहे. 10.डिजिटल व्यवहार प्रचंड वाढल्यामुळे आर्थिक व्यवहार बँकेतून होऊ लागले आहेत. त्यामुळे 80 टक्के अर्थव्यवहार संघटीत अर्थव्यवस्थेमध्ये होऊ लागले आहेत.

आपण याकडे कसे पाहणार?

अहवालातील हे मुद्दे पाहिल्यावर असंघटीत क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा कमी होतो आहे, हे अगदी स्पष्ट होते, मात्र पारंपरिक चष्मा न बदलल्यास हा असंघटीत क्षेत्रावर अन्याय आहे, असा समज होऊ शकतो, पण हा बदल अपरिहार्य आहे, या दृष्टीने याकडे पाहिल्यास हे कधीतरी होणारच होते, ते काही आर्थिक सुधारणांमुळे होते आहे, चांगल्या पद्धतीने होते आहे, याची खात्री पटते. उदा. जनधन बँक खात्याच्या मार्फत 44 कोटी नागरिकांना आता बँकिंग करण्याची सुविधा मिळते आहे, याचा अर्थ संघटीत आर्थिक व्यवहारांचा लाभ आता त्यांनाही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे किंवा अगदी अलीकडील ई-श्रम पोर्टलचे उदाहरण घेऊ. या पोर्टलवर असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंद होते आहे. ती नोंद एकदा झाली की, संघटीत क्षेत्रातील कामगारांना ज्या सेवासुविधा मिळतात, त्यातील काही सुविधा असंघटीत कामगारांनाही मिळू शकतील. शेतकर्‍यांना आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईलच्या जोडणीने जशी सरकारी मदत आणि अनुदान देणे शक्य झाले आहे, तसाच हा बदल आहे.

बदलाचे रूपांतर संधीत कसे होईल?

आता प्रश्न असा उपस्थित होतो की, आपण यातून काय बोध घ्यायचा? असंघटीतकडून संघटीत ही प्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी तिचा विचार करत बसण्याची गरज नाही. स्वत:ला संघटीत क्षेत्राशी म्हणजेच संघटीत अर्थव्यवस्थेशी जोडून घेणे, हे मात्र आपण निश्चितच करू शकतो.ते करणे म्हणजे बँकेचे व्यवहार वाढवून आपली आर्थिक पत वाढविणे, आपला क्रेडिट स्कोर चांगला ठेवणे, अधिकाधिक डिजिटल व्यवहार करणे आणि त्या माध्यमातून गुंतवणुकीचे शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा, एनपीएस, डिजिटल सोने खरेदी, असे जे मार्ग निर्माण झाले आहेत, त्याचा लाभ घेणे. सेवा क्षेत्रात होत असलेली प्रचंड वाढ लक्षात घेऊन त्यात रोजगार शोधणे आणि कौशल्ये वाढवीत ठेवून रोजगाराच्या स्वरूपातील बदल स्वीकारत राहणे. अशा काही बदलांसाठी आपल्या मनाची तयारी केली की असंघटित अर्थव्यवस्थेचा वाटा कमी होतो आहे, याची भीती न वाटता या बदलाचे रूपांतर संधीत होऊ शकते.

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply