जमैका : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बाजी मारत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दुसर्या डावात शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जमैकाच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये दुसर्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी रहाणेने पत्रकारांशी संवाद साधला. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर झळकावलेले शतक आपल्यासाठी खास असल्याचे या वेळी त्याने नमूद केले.
‘पहिल्या कसोटीदरम्यान झळकाविलेले कारकिर्दीतले दहावे शतक हे माझ्यासाठी विशेष होते. मी सेलिब्रेट कसे करायचे हे काही ठरवले नव्हते. ते आपसूक घडून गेले. मी थोडासा भावूकही झालो होतो. या शतकासाठी मला दोन वर्षे वाट पाहावी लागली. या काळात मी सतत माझा खेळ सुधारण्याकडे भर देत होतो. याचसाठी हे दहावे शतक माझ्यासाठी विशेष आहे, असे रहाणे याने सांगितले.
अँटीग्वा कसोटीत पहिल्या डावामध्ये भारतीय फलंदाजांनी खराब सुरुवात केल्यानंतर रहाणेने 81 धावांची खेळी करीत संघाच्या डावाला आकार दिला होता. दुसर्या डावात त्याने विराट कोहलीच्या साथीने शतकी भागीदारी रचत आपले शतक झळकाविले.