शेतकर्यांचे कंबरडे मोडले; भातशेतीचे अतोनात नुकसान
उरण : प्रतिनिधी
ऐन दिवाळीत शुक्रवारी रात्री 7:30 ते 8:30 दरम्यान पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने संपूर्ण उरण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. तालुक्यात बहुतेक ठिकाणी भाताची कापणी करण्याचा हंगाम सुरू असल्याने या अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले. भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उरण तालुक्यात बहुतेक ठिकाणी वादळी वार्यासह विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगटासह पर्जन्यवृष्टी झाली. सुमारे एक तास अचानक झालेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत केले. या पावसाने सर्वांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. दुकानदार, शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले, दिवाळीचे दिवे पावसात वाहून गेले.
या पावसामुळे अनेक शेतकर्यांच्या मळण्या भिजल्या असून गुरांसाठी राखून ठेवण्यात आलेला सुका पेंढादेखील भिजला असल्याने गुराढोरांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. उरण पूर्व भागात रब्बी हंगामात वाल, चवळी, हरभरा, मूग या कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. भाताची कापणी पूर्ण झाल्यावर या रब्बी पिकांची पेरणी केली जाते, मात्र पावसामुळे या रब्बी पिकांची पेरणी वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. आणखी दोन दिवस तालुक्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. अगोदरच पावसामुळे शेतकर्याचे पीक घटले आहे. त्यातच या अवकाळी पावसाने भात पिकाची मोठी वाताहत केली. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.