Breaking News

निष्क्रियतेचे किती बळी?

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेतील बहुतेक तपशील यापूर्वीच्या अशा दुर्दैवी घटनांमध्येही अस्तित्वात होते. त्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच राज्यभरातील हॉस्पिटलांचे फायर ऑडिट करण्यात आले. परंतु ऑडिटनंतर अग्निशमन दलाकडून आलेल्या सूचनांची अंमलबजावणीच केली गेली नाही तर निव्वळ ऑडिटमधून काय साधणार? मागील दुर्दैवी घटनांमधून संबंधितांनी काहीच बोध घेतला नाही एवढेच यातून अधोरेखित होते. महाराष्ट्रात अशा तर्‍हेच्या घटना पुन्हा पुन्हा का घडत आहेत? हॉस्पिटलांमधील दुरावस्थेकडे लक्ष देण्यास राज्यातील आघाडी सरकारला अद्यापही फुरसत मिळाली नसावी का?

दिवाळी हा दिव्यांचा सण, तेजाचा चैतन्यमयी उत्सव. यंदाची दिवाळी तर आपणा सार्‍यांसाठीच खास. कोरोना महामारीचा हतबल करून टाकणारा, नैराश्यपूर्ण कालखंड मागे टाकून आपण सारेच नव्या आशेने, नव्या उमेदीने जगण्याला सामोरे जात असताना दीपावलीने तिच्या पारंपरिक तेजाने आपल्या प्रयासांना नवे बळ दिले. सारेच अतिशय मनापासून, आनंदाने, या उत्सवात सहभागी झालेले असताना अकस्मात पुन्हा नजीकच्या अंधकारमय कालखंडाची आठवण उकरून काढणारी दुर्दैवी घटना अहमदनगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात घडली. राज्यात पुन्हा एकदा हॉस्पिटलमधील अग्नितांडवाने 11 कोरोना रुग्णांचा बळी घेतला. आगीच्या या घटनेचे सारे तपशील गेल्या वर्षीच्या अशाच भीषण घटनांशी मिळतेजुळते दिसत आहेत याला काय म्हणावे? मृतांपैकी काही रुग्णांचा ऑक्सिजनपुरवठा बंद केल्यामुळे गुदमरून बळी गेला आहे तर अन्य काही जण स्थलांतर करीत असताना दगावले आहेत. आग व्हेंटिलेटरमुळे लागली की एसीतील शॉर्टसर्किटमुळे याविषयी तर्कवितर्क करण्यात येत आहेत. एवढे मात्र निश्चित आहे की अलीकडेच करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये तेथे आग लागल्यास आवश्यक असणारी कुठल्याही स्वरुपाची यंत्रणा अस्तित्वात नव्हती. ना तिथे आगीच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा होती ना पाण्याचे फवारे मारणारे स्प्रिंकलर वा पाण्याचे पंप. या सार्‍याची तातडीने पूर्तता करण्यात यावी अशी स्पष्ट सूचना अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती. अर्थातच त्याकडे कुठल्याही स्तरावर लक्ष दिले गेले नाही. खेरीज जेथे ही दुर्दैवी घटना घडली, त्या अतिदक्षता विभागात विजेच्या तारांचा संच होता. तेथे गुंता झाला होता व तेथेच शॉर्टसर्किट झाले असावे अशी शंका व्यक्त केली जाते आहे. तेथूनच ऑक्सिजनच्या पाइपने पेट घेतल्याने आग भडकत गेली असावी. यंत्रणेअभावी आग लागल्याचे लागलीच लक्षात आले नाही तसेच तातडीच्या उपाययोजनेची यंत्रणाही अस्तित्वात नव्हतीच. ग्रिल, खिडक्या पक्क्या बंद असल्यामुळे अग्निशमन दलाच्या कामात अडथळेही आलेच. पीओपीचे काम केलेले असल्यामुळेही धूर वाढत गेल्याचे सांगितले जाते. आगीचे नेमके कारण संबंधित दलाच्या पाहणीतूनच स्पष्ट होऊ शकते. असे असताना आग व्हेंटिलेटरमुळे लागली असावी आणि हे व्हेंटिलेटर पीएम केअर फंडातून देण्यात आलेले आहेत असे म्हणत केंद्रसरकारकडे बोट दाखवणे तर निव्वळ संतापजनक आहे. घटनेनंतर कितीएक राजकीय नेत्यांनी संबंधित रुग्णालयाकडे धाव घेतली. हेही नित्याचेच झाले आहे. यातील किती जणांचा तेथील बचावकार्यात सहभाग होता याचीही चौकशी होण्याची गरज आहे. मृतांच्या नातेवाईकांना काही लाखांची मदत जाहीर करून पुन्हा एकदा निष्क्रियतेचाच कारभार मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर ते या महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणायचे, आणखी काय?

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply